लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 4 : ‘नैसर्गिक साधन संपत्तीची भरभराट होऊन विश्वाचे कल्याण होवो’, अशी प्रार्थना करत काठी ता़ अक्कलकुवा येथील राजवाडी होळी शुक्रवारी पहाटे पेटवण्यात आली़ तत्पूर्वी येथे रात्रभर लोकसंस्कृतीचा जागर झाला़ रात्रभर वाजणारे ढोल, मोरखी, बावा, बुध्या, ढाणका यांच्या कमरेला बांधलेल्या घुंगरू आणि तुंबडय़ांचा होणारा मधुर आवाज सातपुडय़ात दुमदुमत होता़ होलिकोत्सवात आमदार क़ेसी़ पाडवी, जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, पोलीस अधिक्षक संजय पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, माजीमंत्री पद्माकर वळवी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, माजी आमदार नरेंद्र पाडवी, जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी आशा पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी गावीत, पोलीस निरीक्षक पंडीतराव सोनवणे, माजी सभापती सी़क़ेपाडवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होत़े सातपुडय़ाच्या दुर्गम भागात असलेल्या काठी येथे मानाची राजवाडी होळी पेटवण्याची परंपरा आह़े डाब (मोरीराही) येथील देवहोळीनंतर सातपुडय़ात होळीला सुरूवात झाली होती़ शुक्रवारी पहाटे काठी येथील राजवाडी होळी पेटवण्यात आली़ तत्पूर्वी काठी येथील मुख्य होळी चौकात होळीसाठी नवस करणारे मोरखी, बावा, बुध्या, ढाणका यांच्या पथकांनी ढोल, बिरी, बॅन्ड याच्या तालावर नृत्य केल़े डोक्यावर मोरपिस आणि कागदापासून तयार केलेला तुरा, त्यावर लायटिंग, अंगावर पांढरी नक्षी या वेशातील बावा आणि बुध्या यांच्या नृत्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले, रात्रभर सुरू असलेल्या जल्लोषाचा समारोप पहाटे होळी पेटवून करण्यात आला़ होळी दर्शनानंतर नवस करणा:यांनी उपवास सोडल़ेगेल्या काही वर्षात लोकप्रिय होत असलेल्या काठीच्या पारंपरिक राजवाडी होळीसाठी मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल झाले होत़े धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यासह नाशिक, पुणे, सोलापूर, ठाणे, मुंबई जिल्ह्यातील पर्यटक तसेच गुजरात, मध्य प्रदेशातील आदिवासी बांधव आणि पर्यटक याठिकाणी हजर होत़े पर्यटक आणि आदिवासी बांधवांच्या सोयीसाठी येथे पारंपरिक मेलादा उत्सव भरवण्यात आला होता़ यात प्रामुख्याने विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, फळे, पूजा साहित्य यासह खेळणीची दुकाने होती़ रात्रभर सुरू असलेल्या या उत्सवातून हजारो रूपयांची उलाढाल झाली़ रात्री उशिरार्पयत अक्कलकुवा व धडगाव मार्गाने पर्यटक खाजगी वाहनातून काठीकडे येत होत़े
काठीच्या राजवाडी होळीने लोकसंस्कृतीच्या रंगात रंगला ‘सातपुडा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 12:41 PM