नंदुरबार : होमगार्डसना कमी मानधन असूनही जास्त काम करावे लागते. अर्थात 40 टक्के कवायत आणि 40 टक्के बंदोबस्त अशा जाचक अटी घालून होमगार्ड जवानांना वेठीस धरले जात असल्याची खंत होमगार्ड जवानांनी जिल्हाधिका:यांकडे व्यक्त केली आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात होमगार्ड जवानांनी आपल्या व्यथा व वेदना मांडल्या आहेत. होमगार्ड संघटनेची स्थापना 1946 मध्ये झाली. 71 वर्षापासून हे जवान मानधन तत्वावर काम करतात. होमगार्डच्या राज्याच्या महासमादेशकांनी 1 जानेवारी 2016 पासून नवीन नियम लागू केले. त्यामुळे नंदुरबारसह जिल्ह्यातील 90 टक्के व राज्यातील हजारो होमगार्डस्चे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.नंदुरबार पथकातील 50 होमगार्डला आठ ते 10 दिवसांच्या कालावधीत 40 टक्के परेड व 50 टक्के बंदोबस्ताच्या नावाखाली जाचक अटी लादून कमी केले. त्यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वेळोवेळी बंदोबस्तात हजरदेखील झालेलो आहोत. मानसेवी असल्याकारणाने आम्हा होमगार्डसना दुय्यम व्यवसाय करावा लागतो. जर आम्ही आजच्या स्थितीत पूर्णवेळ संघटनेकरीता दिला असता तर आमचे कुटुंब उघडय़ावर पडले असते. ही परिस्थिती निर्माण होऊ नये, या कारणाने आम्ही 40 टक्के कवायत असो किंवा 40 टक्के बंदोबस्त अशा महासमादेशकांच्या जाचक अटी नियमांना बळी ठरलो.होमगार्ड संघटनेत भरती होताना सांगण्यात येते की, तुम्हाला तुमचे काम करून जो वेळ मिळेल, त्यात देशसेवा म्हणून बंदोबस्त करा. जर एखादा होमगार्ड खाजगी अथवा शासकीय ठिकाणी कामाला असेल तर तो 40 टक्के कवायत व 40 टक्के बंदोबस्त करू शकत नाही. नंदुरबार जिल्ह्यात तीन वर्षात फक्त एक ते दोन उजळणी शिबिरे, अल्प काळाची अन् अल्प सूचनेने झाली. त्यामुळे शिबिर करता आले नाही.होमगार्डस्ना पोलीस भरतीतील नियमाप्रमाणे 1600 मीटर धावणे, गोळाफेक बंधनकारक आहे. जे होमगार्डस नवीन अथवा जवान आहेत ते मैदानी चाचणी देवू शकतात. परंतु ज्यांची 10 ते 25 वर्षे देशसेवा झाली आहे व करीत आहेत असे होमगार्ड मैदानी चाचणीत कसे उत्तीर्ण होणार?, पोलीस ही शासनाची पगारी सुविधा घेणारी शासनाची बांधिल संघटना आहे. त्यांची तुलना आमच्या 400 रुपये मानधन घेणा:या संघटनेशी कशी करू शकता?महसमादेशकांनी ज्या नियमांनी होमगार्डना कमी केले आहे ते नियम सध्या त्यांच्यावर न लावता त्यांना परत कामावर घ्यावे. यापुढे तीन वर्षानी त्यांच्यावर ते नियम लावावेत, अशी मागणी केली आहे. त्यामुळे नियम पालनात झालेली चूक सुधारण्यास संधी मिळेल व होमगार्डलादेखील शाश्वती वाटेल.
जाचक अटींमुळे होमगार्ड जवान हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 12:12 PM