नंदुरबार : घोड्यांच्या टापांनी काठी व परिसर आज दिवसभर गुंजला. निमित्त होते दसऱ्यानिमित्त आयोजित घोड्यांच्या शर्यतीचे अर्थात अश्वमेध स्पर्धेचे. ११० स्पर्धाकांसाठी ५५ राउंड करण्यात येणार आहेत. दोन दिवस या स्पर्धा चालणार असून काठी येथे हजारो अश्वप्रेमी स्पर्धा पाहण्यासाठी दाखल झाले आहेत.
सातपुड्यातील डोंगराळ भागातील काठी संस्थानात विजयादशमी सणानिमित राजगादी / शस्त्रपूजन करून अश्वमेध स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला. काठी संस्थानचे वंशज पृथ्वीसिंग पाडवी / महेंद्रसिंग पाडवी, तसेच त्यांचे मोठे बंधू यांचा हस्ते सकाळी विधिवत विजयादशमी निमिताने राजगादी व शस्त्रपूजन करण्यात आले. राजगादीचे व शस्त्रपूजन झाल्यावर संपूर्ण संस्थानिक कुटुंब एकत्र बसून सामूहिक परमेश्वराची प्रार्थना करून देवीदेवतांना वंदन करून एक दुसऱ्याला हदयस्पर्शी आलिंगन दिले.
संध्याकाळी विजयादशमी पर्वावर अश्वमेध स्पर्धांचे उद्घाटन काठी संस्थानचे वंशज पृथ्वीसिंग पाडवी, महेंद्रसिंग पाडवी, अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती नानसिंग शिवाजी वळवी, माजी उपसभापती विजय पाडवी, माजी जि.प. समाजकल्याण सभापती सी. के. पाडवी, सरपंच स्नेहा जितेंद्र पाडवी, सागर पाडवी, राजाफांटा सांस्कृतिक एवम कला मंडळ काठीचे अध्यक्ष राजेंद्र पाडवी, उपाध्यक्ष गणपत पाडवी, सचिव बहादुरसिंग पाडवी, खजिनदार करणसिंग पाडवी, करमसिंग पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सहभागी झालेल्या ११० स्पर्धकांच्या चिठ्ठ्या काढून ५५ राउंन्ड करण्यात आले. दोन दिवस अर्थात बुधवारी देखील या स्पर्धा होणार आहेत. मोलगी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. स्पर्धा यशस्वितेसाठी राजाफाटा सांस्कृतिक मंडळाचे सर्व सदस्य स्वयंसेवक म्हणून काम पाहत आहेत. अश्वमेध स्पर्धा पाहण्यासाठी तालुका तसेच जिल्हा स्तरावरून हजारो अश्वप्रेमी दाखल झाले आहेत. खाद्यपदार्थ विक्रेते व खेळणी विक्रेतेही दाखल झाल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे.