ऑनलाईन लोकमत
म्हसावद,दि.7 - बुडीगव्हाण, ता.शहादा येथे नाल्यालगत असलेल्या झोपडीत पुरात वाहून आलेला नाग (कोब्रा) घुसल्याने कुटुंबाला रात्र जागून काढावी लागल्याची घटना घडली.
दोन दिवसांपूर्वी जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना मोठय़ा प्रमाणात पूर आल्याने पुरासोबत वाहून आलेला कोब्रा बुडीगव्हाण येथे नाल्यालगत असलेल्या मोतीलाल तीरसिंग बागले यांच्या झोपडीत घुसला. रात्री दोन वाजता काही तरी पडल्याच्या आवाजाने आवशीबाई बागले उठली असता समोर चक्क चार-साडेचार फुटांचा कोब्रा फणा काढून उभा असलेला दिसला. त्यानंतर कुटुंबातील सर्वानी झोपडीबाहेर रात्र जागून काढली.
हा कोब्रा पाहण्यासाठी सकाळी बुडीगव्हाण येथील ग्रामस्थांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. म्हसावद येथून सर्पमित्र सुधाकर पाटील, जयंत पाटील हे आले. त्यांनी नागाला पकडून अक्कलकुवा भागात सुरक्षित जागी सोडले.