जयनगर : सध्या सगळीकडे ऑनलाइन शिक्षणाचा उदो उदो होत असताना शहादा तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागातील पालकांना अजून कितला दिन शाळा बंद रातीन? असा प्रश्न पडत आहे. सध्या जिल्ह्यासह शहादा तालुक्यात सर्व परिस्थिती ‘ऑल इज वेल’ असताना अजूनही प्राथमिक शाळा चालू होत नसल्यामुळे असा प्रश्न पालकांना पडणे स्वाभाविक आहे.
मार्च २०२० पासून कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून प्राथमिक शाळेतील वर्ग बंदच आहेत. अजूनही हे वर्ग चालू होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे शहादा तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी गावातील पालकांना आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा चालू होण्याचे वेध लागले आहे. कारण कोरोनामुळे अजूनही बंद असलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, दोन अक्षय तृतीया गेल्या तरी शाळा चालू होत नाहीये. आता कोरोना काळातली सलग दुसरी दिवाळी तोंडावर आली तरी शाळा चालू होण्याचे कोणतेच सकारात्मक चिन्हे दिसत नसल्यामुळे पालक आपल्या मुलांच्या भवितव्याबाबत खूपच चिंतेत आहेत.
सलग १८ महिन्यांपासून मुले घरीच बसून आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग चालू झाल्यामुळे अनेक मुले आपापल्या आश्रमशाळेत किंवा बाहेरगावी माध्यमिक शाळेत शिक्षणासाठी जात आहेत. मात्र, पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अजूनही अंधारातच आहे. ही मुले घरीच असल्यामुळे केवळ खेळ खेळूनही कंटाळली आहेत.
शहादा तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी गावातील पालकही मुले सध्या घरी असल्यामुळे त्यांना कापूस वेचणीसाठी घेऊन जाताना दिसत आहेत. ग्रामीण तसेच आदिवासी भागातील मुले शाळा बंद असल्यामुळे वही-पेन, पाटी-पेन्सिल या शैक्षणिक वस्तू हाताळताना दिसत नसल्याचे अनेक ठिकाणाचे वास्तव चित्र निदर्शनास येत आहे. खेळ खेळण्याबरोबर शेतीकामासोबत मुले गुरे-ढोरे, शेळ्या चारतानाही दुर्गम आदिवासी भागात दिसत आहेत.
देशातील सर्व खासगी, सरकारी कार्यालये चालू आहेत. किराणा दुकाने, मॉल्स, व्यवसाय - उद्योगधंदे सगळे काही सुरळीतपणे चालू आहे. मग शाळा अजूनही का बंद आहेत? असा प्रश्न सध्या ग्रामीण व आदिवासी भागातील निरक्षर व स्मार्टफोनची ओळख नसलेल्या पालकांना पडत आहे. कारण शासन ऑनलाइन शिक्षणाचा दावा करत असली तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील परिस्थिती मात्र, खूपच वेगळी आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक अभ्यासाची पीडीएफ स्मार्ट फोनवर पाठवत असले तरी अनेक पालकांकडे स्मार्ट फोन नसल्यामुळे आपल्या मुलासाठी अभ्यास आला आहे हेही समजत नाही. किंवा स्मार्ट फोन असल्यासही त्याच्यातील काहीच उमजत नसल्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्षात शाळा चालू होत नाही, तोपर्यंत त्यांच्या मुलांचे भवितव्य अंधारातच राहील.