शहादा : रामजन्मभूमीवर राम मंदिर निर्माणासाठी पाठिंबा दर्शविण्यासाठी शहादा शहरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे भव्यहुंकार शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा शहीद लालदास चौकातील राम मंदिरापासून करण्यात आली. प्रारंभी राम मंदिरात विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री प्रशांत हरताळकर, प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम धनकानी यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.शोभायात्रा राम मंदिरापासून काढण्यात आली. शोभा यात्रेची सुरुवात दुपारी सव्वाचार वाजता झाली. शोभायात्रेत जिल्हाध्यक्ष जत्रा पावरा, जिल्हामंत्री विजय सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते अजय शर्मा, केवलसिंग राजपूत राजा साली, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, नगरसेवक संजय साठे, संदीप पाटील, केशव महाराज पाठक, प्रशांत पाटीलसह हजारो रामभक्त सहभागी झाले होते. या वेळी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर हुबेहूब रामायणाचा देखावा सादर केला होता. शिवाय अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. या वेळी शहर पूर्णत: भगवामय झाले होते. याप्रसंगी रामभक्त श्रीरामांचा जयघोष करीत होते. मंदिर वही बनायेंगे जय श्रीरामचा नारा देत होते. या रॅलीमुळे रामभक्तांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. ही शोभायात्रा शहीद लालदास चौक, सराफ गल्ली, तूप बाजार, मेन रोड, जामा मशिदी चौक, महात्मा गांधी पुतळा, तहसील कचेरी, दोंडाईचा रस्ता, महात्मा फुले चौकात आणण्यात आली. यानंतर शोभायात्रेचे जाहीर सभेत रूपांतर झाले. सभेचे व्यासपीठ महाराणा प्रताप चौकाला लागून करण्यात आले होतेहुंकार सभा व शोभायात्रेसाठी जिल्हाभरातून वाढीव पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. सर्वात जास्त पोलीस बंदोबस्त जामा मशीद चौकात लावण्यात आला होता. जामा मशीद चौकात अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक पंडित सपकाळे, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत सातारकर, तहसीलदार मनोज खैरनार, पोलीस निरीक्षक संजय शुक्लासह शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते. या व्यतिरिक्त जनता चौक, बागवान गल्ली, क्रांती चौक भागातही बंदोबस्त लावण्यात आला होता. धडगाव, तळोदा, नंदुरबार, सारंगखेडा, म्हसावद येथून पोलीस बंदोबस्त मागवला होता. यात सहा पोलीस निरीक्षकांचा समावेश होता. राज्य राखीव दलाच्या पोलीस जवानांची एक तुकडी तैनात केली होती. ठिकठिकाणी एक मार्गी वाहतूक करून पोलिसांनी बॅरिकेटस लावले होते. शोभायात्रेत चार ते पाच हजार रामभक्त सहभागी झाले होते. शोभायात्रेत राम भक्तांमध्ये कमालीचा उत्साह होता. याप्रसंगी जिल्हाभरातून रामभक्त आले होते.
विश्व हिंदू परिषदेतर्फे शहाद्यात हुंकार यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 12:53 PM