नंदूरबार - देशात लॉकडाऊन असल्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरु आहेत. मात्र, त्यासाठीही स्थानिक जिल्हा प्रशासनाला अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे, आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन निर्णय घेते. तर, दुसरीकडे गरिबांची उपासमार होऊ नये, यासाठी अनेक ठिकाणी अन्नछत्र सुरु आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठीही अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संघटना पुढाकार घेत आहेत. जिल्ह्यातील शहादा येथे असाच एक भावनिक प्रसंग पाहायला मिळाला. माती मोल होणाऱ्या आपल्या उत्पादनाची किंमत शेतकऱ्याला मिळाली अन् सर्वाधिक समाधान देणारा आनंदही बोनस मिळाला.
शहादा आडत व्यापारीपेठेचा परिसरात ट्रॅक्टरच्या आवाजाने शनिवारी रात्री 9 च्या सुमारास तिथली शांतता भंग केली. बाजार समितीतील शांतता शेतकऱ्याच्या चिंतेत भर घालणारी …ट्रॅक्टरमध्ये कष्टाने पिकवीलेली कोबी भरलेली …..तीन दिवस बाजार बंद म्हटल्यावर शेतमाल फेकणे किंवा मोफत देणे असे दोनच पर्याय ….अचानक एक व्यक्ती भेटते आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटते, बळीराजाची चिंता आनंदात परिवर्तीत होते.
शहादा येथे हा शनिवारी रात्री घडलेला प्रसंग. मालपूरचे शेतकरी पांडुरंग माळी हे ट्रॅक्टरमध्ये दोन ते अडीच हजार गड्डा कोबी घेऊन रात्री 9 च्या सुमारास आले. बाजारातील शांतता पाहून मनात चिंता निर्माण होणे स्वाभाविकच होते. अशात एकाने 3 दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याचे सांगितले. अर्थ स्पष्ट होता, नुकसान सहन करावे लागणार होते.
माळी यांच्या शेतात कांदा, मका, पपई लागवड केलेली आहे. लॉकडाऊनच्या स्थितीत शेतमाल विकण्याची चिंता आधीच होती आणि त्यात बाजार समिती बंद असल्याने भर पडली. आडत दुकानदार असलेल्या राजेंद्र पाटील यांना शेतऱ्याची अवस्था जाणली आणि किमान त्याचा खर्च वसूल व्हावा यासाठी गावात परिचीत असलेले अल्ताफ मेनन यांची भेट घालून दिली.
मेनन हे खिदमत फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरोना संकटकाळात गरजूंना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्याचा उपक्रम राबवित आहेत. प्रशासनाच्या सोबतीने त्यांनी मदत कार्यात सहभाग घेतला आहे. सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असल्याने राजूभैय्यांनी हक्काने त्यांना शेतकऱ्यास मदत करण्याची विनंती केली. मेनन तातडीने बाजारात पोहोचले. त्यांनी शेतकऱ्याचे नुकसान टाळण्यासाठी 7 हजार रुपयांची रक्कम त्याला रोख दिली आणि कोबी ताब्यात घेतली. गावातील गरजूंना भाजी वाटप करण्याचे ठरल्यावर राजूभैय्यांनाही प्रोत्साहन मिळाले आणि त्यांनी त्यांच्याकडची काकडीदेखील वाटपाला काढली. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर क्षणात दिसणारी चिंता दूर होऊन त्या जागी हास्य फुलले. पैसे घेऊन माळी यांनी समाधानाने गावाची वाट धरली. समाधान केवळ पैसे मिळाल्याचे नव्हते तर सामाजिक कार्यात अप्रत्यक्ष सहभाग होत असल्याचेही. मेनन व राजूभैय्या यांनी प्रशासनाशी संपर्क साधून अमरधाम परिसर, श्रमीक नगर, गरीब नवाज कॉलनीत गरजूंना भाजी वाटप केले.
एकदिलाने संकटावर मात करता येते असे म्हणतात. त्याचा प्रत्यय मेनन यांच्या कृतीने आला. ते देवदूतासारखे आले आणि शेतकऱ्याच्या श्रमाला मोल मिळाले, किमान त्याचे होणारे नुकसान टळले. शेतकरी राजा एरवी आपले पोट भरतो. संकटाच्या स्थितीत त्याला मदत करणे आपले कर्तव्य आहे ही मेनन यांची भावना अनेकांना मदतकार्यासाठी प्रेरित करणारी आहे. पवित्र रमजानच्या प्रारंभापूर्वी असा आनंद मिळणे हेदेखील भाग्याचेच नाही का!
दरम्यान, बाजार समिती बंद असल्याने कोबी फेकणे किंवा तशीच टाकून परत येणे याशिवाय माझ्यासमारे दुसरा पर्याय नव्हता. नुकसान सहन करून मोफत वाटण्याचा विचारही मनात होता. पण, अल्ताफभाईंनी खरेदी केल्याने किमान वाहतूक खर्च आणि मजूरी वसूल झाली. होणारे नुकसान टळले. भाजी गरीबांना मिळाली याचा आनंदही आहेच, असे पांडुरंग माळी यांनी म्हटले.