नंदुरबार: जिल्हाभरात सोमवारी दुपारी गारपीटसह वादळी पाऊस झाला. यामुळे हातातोंडाशी आलेला रब्बीचा गहू, हरभरा या पिकासह नुकताच लागवड केलेला कांदा,पपई व केळीचे शेकडो हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले. सायंकाळी उशिरापर्यंत अनेक भागात पाऊस सुरू होता. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. सोमवारी दुपारपासून अचानक वातावरण बदलले. वादळ वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.
नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात तसेच नवापूर तालुक्यातील अनेक भागात गारपीट झाली. वादळ,पाऊस आणि गारपीट मुळे गहू, हरभरा या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लागवड केलेला कांदा ही वाया गेला. केळी आणि पपईची झाडे मोडून पडली. शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पीक व फळपिकचे नुकसान झाले. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. वातावरणातील या बदलामुळे होळीच्या उत्सवावर ही परिणाम दिसून आला.'