नंदुरबार : बैठे काम, आरामाची मानसिकता आणि आळस यामुळे चालण्याची सवय कमी होऊ लागली आहे. शिवाय, पाच मिनिटांच्या अंतरासाठी देखील स्वयंचलित वाहन वापरले जात असल्याने देखील चालण्यावर परिणाम दिसून येत आहे. परिणामी चाळिशीनंतर गुडघे, कंबरदुखीच्या आजारांनी अनेकांना ग्रासले आहे.
हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते. नियमित चालण्याने दीर्घायुष्य लाभत असते. तसेच रक्तदाबही नियंत्रित राहू शकतो. नियमित चालण्याने वजन नियंत्रित राहते. मनाच्या एकाग्रतेसाठी, चिंतनासाठी चालणे हा एक चांगला व्यायाम आहे. सकाळी चालण्यामुळे हवेतील शुद्ध ॲाक्सिजनचा पुरवठा शरीराला होत असतो.
या कारणासाठी होतेय चालणे
nज्येष्ठ-व्यायाम म्हणून, प्रकृती चांगली रहावी यासाठी सकाळ-संध्याकाळ चालतात.
nमहिला- किराणा दुकान, भाजीबाजारापर्यंत पायी जातात.
nपुरुष-रात्री जेवण झाल्यावर शतपावली करतात
nतरुणाई -गल्लीतल्या गल्लीत पायी फिरतात.
आजचा काळ अतिशय गतिमान झालेला आहे. प्रत्येकाला आपले ध्येय पूर्ण करण्याचा ध्यास लागलेला आहे. अनेकांनी वाहनांचा वापर सुरू केला आहे. चालणे जवळपास बंदच झालेले आहे. स्वयंचलित वाहनांचा वापर वाढला. कार्यालयांमध्ये अनेक तास बसून काम केल्यानेही हाडांचे आजार बळावू लागलेले आहेत.
ज्यांना पायी चालणे शक्य नाही त्यांच्यासाठी
ज्यांना पायी चालणे शक्य नाही त्यांना घरातल्या घरात देखील पायी चालण्याचा व्यायाम करता येतो. याशिवाय बाजारात अनेक प्रकारचे चालण्याच्या व्यायामाचे साहित्य मिळते. त्याचाही उपयोग करता येऊ शकतो. ज्यांना आजार आहे त्यांनी मात्र डॅाक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.