रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पक्षांतर, नवीन कार्यकर्ते, नवीन पक्ष, नवीन उमेदवार यामुळे यंदाच्या निवडणुकीत सुरुवातीला असलेले गोंधळाचे वातावरण हळूहळू निवळू लागले आहे. उमेदवार, नेते आणि कार्यकर्ते यांचीही नाळ ‘होले होले हो जायेंगा प्यार..’ प्रमाणे हळूहळू जुळू लागली असल्याने निवडणुकीचे चित्र देखील अंतिम टप्प्यात स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सुरुवातीला अधिकच गोंधळाचे वातावरण होते. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नंदुरबार मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येलाच राजकारणातील मोठी उलथापालथ झाली. याठिकाणी डॉ.विजयकुमार गावीत यांचे पारंपरिक विरोधक चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे डॉ.गावीत यांची निवडणूक त्यांनी सोपी केल्याचे चित्र असतानाच शहाद्याचे आमदार उदेसिंग पाडवी यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि नंदुरबारमध्ये डॉ.गावीतांना आव्हान दिले. या मतदारसंघात रघुवंशींचे अचानक काँग्रेस सोडणे आणि पाडवींचे भाजप सोडून काँग्रेसमध्ये येणे सुरुवातीला कार्यकर्ते आणि लोकांनाही रुजत नव्हते. पण गेल्या आठ-दहा दिवसाच्या प्रचारात हळूहळू त्यांना समर्थकांची मने वळविण्याच्या प्रयत्नांना यश येत आहे. शहादा विधानसभा मतदारसंघातदेखील भाजपचे उमेदवार राजेश पाडवी हे नवीन आहेत. शासकीय सेवेचा राजीनामा देऊन ते निवडणूक लढवीत आहे. त्यांच्याविरोधात माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी आहे. राजेश पाडवी नवीन असल्याने आणि उदेसिंग पाडवींनी भाजप सोडल्याने याठिकाणी राजेश पाडवी यांना जुने कार्यकर्ते व नवीन कार्यकर्ते यांच्याशी जुळवून घेण्यासाठी सुरुवातीला कसरत करावी लागली. त्यातच याठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक असलेले रुपसिंग पाडवी व राजेंद्रकुमार गावीत यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याच मतदारसंघात सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील व नगराध्यक्ष मोतीलाल पाटील आणि त्यांचे सुपुत्र जि.प.चे माजी सदस्य अभिजित पाटील हेदेखील भाजपत असले तरी त्यांचे एकमेकांमधील मतभेद उघड आहेत. त्यांनाही पक्ष पातळीवर एकत्र आणून काम करणे भाजपच्या नवीन उमेदवारासाठी सुरुवातीला काहीसे अवघड होते. पण त्यांचेही सूर आता जुळू लागले आहेत. याच मतदारसंघात अपक्ष उमेदवार व निवृत्त कार्यकारी अभियंता जेलसिंग पावरा हे देखील ‘एकला चलो रे’ प्रमाणे प्रचारात जोर धरत असल्याने येथील निवडणुकीतही रंगत आली आहे. नवापूर विधानसभा मतदारसंघातील चित्र अधिकच रंगतदार बनले आहे. याठिकाणी गेल्या चार-साडेचार दशकांपासून जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी असलेले सुरुपसिंग नाईक व माणिकराव गावीत या दोन्ही नेत्यांच्या वारसदारांमध्ये लढत आहे. आजवर हे दोन्ही नेते अनेक वर्षे एकत्र एकाच पक्षात असल्याने दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकच होते. पण या निवडणुकीच्या तोंडावरच त्यांच्यात विरोध झाल्याने कार्यकत्र्यानाही कुणाची बाजू घ्यावी असा प्रश्न पडला होता. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारात याठिकाणी देखील हळूहळू दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते प्रचारात समोर येत असल्याने येथील निवडणुकीचे चित्रही स्पष्ट होत आहे. याच मतदारसंघात माजी आमदार शरद गावीत हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. नवापूर मतदारसंघाचा निम्मा भाग नंदुरबार तालुक्यात आहे. शरद गावीत हे डॉ.विजयकुमार गावीत यांचे बंधू तर खासदार डॉ.हीना गावीत यांचे काका आहेत. तर येथीलच प्रभावी नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला असला तरी सुरुपसिंग नाईक व माणिकराव गावीत यांना ते आजवर नेते मानत आले आहेत. त्यामुळे गावीत परिवार व रघुवंशी महायुतीच्याच उमेदवारासाठी शक्तीपणाला लावतील की आतून आपापले हित जोपासतील याबाबत अजूनही लोकांमध्ये साशंकता कायम आहे.अक्कलकुवा मतदारसंघात काँग्रेसतर्फे सलग सातवेळा विजयी झालेले आमदार अॅड.के.सी. पाडवी या वेळी पुन्हा आठव्यांदा काँग्रेसतर्फे रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे आमशा पाडवी निवडणूक लढवीत आहेत. याठिकाणी भाजपचे बंडखोर उमेदवार नागेश पाडवी हेदेखील रिंगणात आहेत. चंद्रकांत रघुवंशी शिवसेनेत गेल्याने येथील शिवसेनेची धुरा त्यांनी सांभाळली आहे. याठिकाणी देखील के.सी. पाडवी यांचे कार्यकर्ते व चंद्रकांत रघुवंशी यांचे कार्यकर्ते आजवर बहुतांश एकच होते. त्यामुळे येथेदेखील संभ्रमीत अवस्था आहे. त्यातच भाजपच्या बंडखोर उमेदवाराने डोकेदुखी वाढवली आहे.एकूणच निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. नेते आणि उमेदवार आपापल्या समर्थकांची मन वळविण्याचे प्रयत्न करीत असून निवडणुकीच्या सुरुवातीला राजकीय गोंधळाचे असलेले वातावरण हळूहळू निवळत आहे.
Vidhan Sabha 2019 : होले होले हो जायेंगा प्यार..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:14 PM