लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातून जाणाऱ्या शेवाळी नेत्रंग महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम अद्यापही प्रलंबित आहे. दोन दिवसांपूर्वी करण चौफुलीवरील खड्डे पोलीसांनी मुरूम टाकून बुजवल्यानंतर बांधकाम विभागाने ‘आम्हीही तेच करणार होतो’ असा खुलासा केला आहे. यामुळे या खड्ड्यांचा प्रश्न यंदातरी सुटणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागाने शेवाळी ते नेत्रंग महामार्गाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाला दिली आहे. या विभागाकडून नंदुरबार जिल्ह्यातून जाणाºया शेवाळी ते नेत्रंग महामार्गावर निर्माण झालेल्या खड्ड्यांबाबत कारवाई झालेली नाही. दरम्यान गेल्या महिन्यात नंदुरबार शहरातील करण चौफुली परिसरात खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु पावसामुळे येथे टाकलेला मुरुम काही दिवसात वाहून गेला होता. परिणामी पुन्हा खड्ड्यातून नागरिकांना प्रवास करावा लागला होता. या प्रकाराने नागरिक हैराण झालेले असतानाही उपाययोजना करण्याकडे संबधित विभागाचे लक्ष नव्हते. यावर मार्ग काढत शनिवारी शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फावडा आणि टोपल्या हाती घेत मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले होते. परंतु दोन दिवसानंतर हा मुरुम पुन्हा वर आला असून खड्डे पुन्हा ‘जैसे थे’ झाले आहेत. या प्रकारानंतर ‘लोकमत’ने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग कक्षाचे कार्यकारी अभियंता विशाल महाले यांना संपर्क करुन माहिती घेतली असता, पोलीसांनी मुरुम टाकून खड्डे बुजवले तेच काम आम्हीही करणार होतो असे सांगितले. दरम्यान या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी शासनाकडून अद्याप निधी आलेला नाही. निधी आल्यानंतर तात्काळ कायमस्वरूपी खड्डे बुजवण्याचे काम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान निधी कधी येणार याबाबत मात्र त्यांनी मौन बाळगले आहे. आपणास येऊन केवळ दीडच महिना झाला असल्याने महामार्ग दुरूस्तीबाबत कोणतीही माहिती नसल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.दरम्यान खड्ड्यांमध्ये अपघात होण्याचे प्रकार वाढले असून करण चौफली ते पोदार हायस्कूल पर्यंत धोकेदायक स्थिती आहे.
पोलीसांनी खड्डे बुजवले नसते तर आम्हीच मुरुम टाकून बुजवणार होतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 1:01 PM