संतोष सूर्यवंशीनंदुरबार : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे भक्कम झालेले स्थान तसेच लोकसभा निवडणुका आदी कारणांमुळे जिल्ह्यासह देशभरातील सराफा बाजारात सोन्याची घसरण बघायला मिळत आहे़ नंदुरबारात सोन्याच्या दरात घसरण होऊन सोने १० ग्रॅम मागे ३३ हजारांवर पोहचले आहे़ तर चांदी किलो मागे ३९ हजार रुपये आहे़गेल्या महिन्यात नंदुरबारातील सूवर्ण बाजार चांगलाच तेजीत होता़ सोन्याचे दर ३४ हजारांपर्यंत स्थिर होते़ तर चांदीदेखील किलोमागे ४१ हजारांपर्यंत पोहचली होती़ एकीकडे भारतीय रुपया भक्कम होत आहे तर दुसरीकडे सेंसेक्स व निफ्टी हे दोन्ही निर्देशांक उंचावल्याने परिणामी सुवर्ण बाजारावर याचा परिणाम होताना दिसून येत आहे़ सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया ६९.५४ रुपये इतका आहे़ त्यामुळे याचा थेट परिणाम सोन्यात होत असलेल्या परकीय गुंतवणूकीवर होत असल्याची माहिती देण्यात येत आहे़ तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमुळे शेअर बाजार उसळी घेत आहे़ गेल्या महिन्यात भारत-पाक सिमेवर युध्दजन्य वातावरण निर्माण झाले होते़ त्यामुळे सोन्याच्या भावात अधिक वाढ झाली होती़ त्यामुळे नंदुरबारात कधी नव्हे ते सोन्याचे दर १० ग्रॅममागे ३४ हजार ते ३४ हजार ५०० पर्यंत गेले होते़ परंतु आता आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता असल्याने परकीय गुंतवणूकदारांची भांडवली बाजारात पुन्हा गुंतवणूक वाढली आहे़ पुढील काही दिवस सुवर्ण बाजारात अस्थिरता कायम राहिल़मंगळवारी ३७,५३५ वर बंद झालेला सेंन्सेक्स निर्देशांक बुधवारी सकाळी उघडताच ३७,६०८ वर होता़ तर दुपारी साडेतीन वाजता ३७,७५२ पर्यंत मजल मारत स्थिरावला़ यात, जवळपास ०.५८ टक्के इतकी वाढ झालेली दिसून आली़ गेल्या सहामाहितील हा सर्वाधिक उच्चांक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले़ निफ्टी निर्देशांक देखील मंगळवारी ११,३०१ वर बंद झाला होता़ बुधवारी तो ११,३२६ वर ओपन होऊन भांडवली बाजार बंद होतेवेळी ११,३४१ वर स्थिरावला़ यात सुमारे ०.३६ टक्के इतकी वाढ झालेली दिसून आली़
शेअर बाजार उसळला तर सोने घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:13 AM