लोकमत न्यूज नेटवर्क, नंदुरबार : या देशाचे खरे मालक आदिवासीच असून, भाजप त्यांना वनवासी संबोधून त्यांच्या न्याय्य हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, देशात काँग्रेसची सत्ता येताच आदिवासींना त्यांचा हक्क देऊन देशाच्या विकासात लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार भागीदारी मिळवून देऊ, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे दिले.
‘भारत जोडो न्याय यात्रे’चे मंगळवारी गुजरातमधून महाराष्ट्रात आगमन झाले. यावेळी राहुल गांधी यांचे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते मानाची होळी पेटविण्यात आली. तसेच ध्वज हस्तांतराचा कार्यक्रम झाला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते.
आदिवासींसाठी हे करणार...
- वनाधिकाराचे अनेकांचे दावे या सरकारने नाकारले आहेत. त्या दाव्यांची वर्षभरात पुन्हा सुनावणी करून आदिवासींना जमिनी देऊ - वनाधिकार बिल अधिक सक्षम करून जल, जंगल, जमिनीवर आदिवासींना अधिकार देऊ. - ज्याठिकाणी आदिवासींची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे तो भाग सहाव्या शेड्युलमध्ये टाकून तेथील सर्व स्थानिक अधिकार आदिवासींना घेण्याचा अधिकार देऊ, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
आज धुळ्यात
धुळ्यात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बुधवार १३ मार्च रोजी दुपारी १२ ते १ यावेळेत महिला न्याय हक्क परिषद होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ७:३० वाजता त्यांचा दोंडाईचात रोड शो होईल.
देशात काँग्रेसची सत्ता येताच वर्षभरातच सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणना करून समाज जीवनाचा एकप्रकारे एक्स-रे करणार आहोत. कारण, त्यातूनच खरा उपचार होणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने २२ उद्योगपतींना १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. ‘मनरेगा’चे वार्षिक बजेट ६५ हजार कोटींचे असते. हे सूत्र लक्षात घेतल्यास २४ वर्षांची ‘मनरेगा’ची रक्कम सरकारने माफ केली आहे. - राहुल गांधी, काँग्रेस नेते.