नंदुरबार : पाणी नाही तर किमान दऱ्याखोऱ्यातून पाणी आणण्यासाठी गाढवं तरी द्या अशी आर्त मागणी नर्मदा काठावरील अतिदुर्गम भागातील तिनसमाळ भागातील ग्रामस्थांनी केली आहे.
दुर्गम भागात असलेल्या तिनसमाळ येथे जाण्यासाठी धड रस्ता नाही. पाणी योजना नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागते. जवळच नर्मदा नदीचे बॅकवॉटर असले तरी ते पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे दऱ्याखोऱ्यातील झऱ्यांमधून, नदीतून पाणी आणावे लागते. रस्ते नसल्याने पायी किंवा गाढवावरून पाणी आणावे लागते. प्रशासनाला जर पाणी देणे शक्य नसेल तर पाणी वाहून नेण्यासाठी किमान गाढवं तरी पुरवावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या भागात जंगल व घाटाचा भाग असल्यामुळे हिंस्र प्राण्यांचा या परिसरात वावर आहे. मागील काही वर्षांत पाणी घेण्यासाठी गेलेल्या दोन मुले व एक वृद्धावर बिबट्याने हल्ला केला होता. मागील एक वर्षांपासून मनरेगा योजनेतून वैयक्तिक सिंचन विहिरीची मागणी केली आहे; परंतु, मंजुरी मिळत नसल्यामुळे योजनेपासून गाव वंचित आहे. गावपाड्यात एकही शासनाची विहीर किंवा इतर सुविधा नाही. प्रत्येक पाड्यातील रहिवासी दरी-खोऱ्यातून मिळेल तेथून पाणी आणून वापरतात.