नंदुरबार : पाणी हा शरीरासाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण घटक आहे. असे असले तरी पाणीही मर्यादित पिल्यास शरीराची ठेवण चांगली राहू शकते. अन्यथा व्याधींचा त्रास जाणवण्याची शक्यता असते. यामुळे तहान लागली की मगच पाणी प्यावे असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
गेल्या काही वर्षात जलजन्य आजार, किडनी स्टोन यासह इतर आजारांचा त्रास असलेले रुग्ण वाढीस लागले आहेत. दूषित पाणी तसेच क्षारयुक्त पाण्याचे सेवन केल्याने ही समस्या निर्माण होत आहे. यातून पाणी अधिक प्यावे असे संदेश सोशल मीडियात व्हायरल होतात, परंतु हे संदेश पूर्ण माहिती नसलेले असल्याने डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
शरीरात पाणी जास्त झाले तर...
शरीरात पाणी जास्त झाले तर त्याचाही शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. गरजेपेक्षा जास्त पाणी मूत्राशयाला बाधा देणारे ठरु शकते. किडनी एकाचवेळी एवढे पाणी बाहेर फेकू शकत नाही. किडनीचे विकार असलेल्यांनी डाॅक्टरांच्या सल्ल्याने पाणी पिणे कधीही योग्य असते, अन्यथा आजार बळावण्याची शक्यता असते.
प्रत्येक व्यक्तीने ऋतूमानानुसार तहान लागल्यावर पाणी पिणे गरजेचे आहे. सरासरी तीन लीटरपर्यंत पाणी दिवसभरात पिणे योग्य ठरते. त्यापेक्षा अधिक पाणी पिणे शरीराला हानीकारक ठरु शकते. पोटाचे विकार, किडनी किंवा डायलिसीसवर असलेल्या रुग्णांनी योग्य त्या पद्धतीने माहिती घेऊन तसेच वैद्यकीय सल्ला घेऊन दिवसभरातील पाण्याचे नियोजन केले पाहिजे. जेवणानंतरही भरपूर पाणी पिऊ नये.
- डॉ. रोशन भंडारी, नंदुरबार.
शरीरात पाणी कमी पडले तर...
शरीरात पाणी कमी पडले तर त्याचा किडनीवर दुष्परिणाम होतो. त्यात मूत्राशयात संसर्ग होणे, डिहायड्रेशन होणे, मुतखडा होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो, तसेच ज्यांना आधीच मुतखड्याचा विकार आहे, त्यांनी पाणी घेतले तर त्यांना वारंवार मुतखडा होऊ शकतो.
किडनी विकार असणाऱ्यांनी घ्या काळजी
किडनीचे विकार असणाऱ्यांना मर्यादेतच पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यांना ८०० मिली पर्यंत पाणी दिले जाते.