नंदुरबार: मी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा सहायक आहे, असे सांगून आमदार राजेश पाडवी यांच्याकडे पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत स्वतः पाडवी यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, नीरज राठोडने आपल्याला फोन केला होता, पण तो फ्रॉड असल्याचे लक्षात येताच त्याला आपण ‘ब्लॉक’ केले, अशी प्रतिक्रिया आमदार राजेश पाडवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने मंत्रिपद हवे असेल तर माझ्याकडे अथवा माझ्या सहायकाकडे पैसे पाठवा. मी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा सहायक आहे, असा फोन भारतीय जनता पक्षातील पाच आमदारांना नीरज राठोड या व्यक्तीने गुजरात राज्यातील सुरत येथून केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या पाच आमदारांमध्ये शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांचे नाव आल्यानंतर संपूर्ण मतदारसंघात याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. यासंदर्भात आमदार राजेश पाडवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाची माहिती दिली.
‘९ मे रोजी माझ्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. मी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा याच्यामार्फत बोलत असल्याचे त्याने सांगितले. आपणास राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद हवे असेल तर आपण मी सांगतो तसे करा. तसेच दोन तासांत नड्डासाहेब आपल्याशी बोलणार असल्याचे सांगितले. पण आपण पोलिस दलात नोकरी केल्याने लागलीच कॉल फ्रॉड असल्याचा आपल्याला संशय आला. आपण जेव्हा त्याचे फोन लोकेशन घेतले तर तो सुरतहून बोलत असल्याचे कळाले. आपण लागलीच तो नंबर ब्लॉक केला. भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, या पक्षात असे होत नाही. त्यासाठी एक कार्य मंडळ स्वतंत्ररीत्या अभ्यास करून पक्षाच्या प्रमुखांना अहवाल देते, त्या अहवालावर राज्याचे पदाधिकारी राष्ट्रीय नेतृत्वाला आपला अभिप्राय देतात, अशी माहिती पाडवी यांनी दिली.