नंदुरबार : नवापूर तालुक्यातील सोनखांब शिवारात धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर गुजरातमधून महाराष्ट्रात वाहून नेण्यात येणारा १९ लाख रुपयांचा अवैध गुटखा विसरवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने जप्त केला. वाहनासह एकूण ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी यावेळी ताब्यात घेतला. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर सोनखांब शिवारात विसरवाडी पोलीस ठाण्याचे पथक गस्त करत असताना हे एका हाॅटेलजवळ एमएच १८ बी ७९३६ हा ट्रक संशयितरित्या आढळून आला होता. पोलीसांना पाहताच चालकाने ट्रक काढण्याचा प्रयत्न सुरु केला होता. ही बाब लक्षात आल्यानंतर गस्तीपथकाने चालकाला थांबवून विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. यातून पोलीसांनी ट्रकची तपासणी केली असता, आत १९ लाख ५ हजार २०० रुपयांचा गुटखा आढळून आला. एकूण १७ हजार ६०० पाकिटे ट्रकमध्ये रचून ठेवण्यात आली होती.
पोलीसांनी १९ लाख रुपयांचा गुटखा आणि १३ लाख रुपयांचा ट्रक असा एकूण ३२ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनात विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्यासह पथकाने केली. दरम्यान याप्रकरणी अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी आनंद भाऊराव पवार यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक सागर भटू चौधरी रा. धुळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे करत आहेत.