रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमावर्ती भागात वाळूची मोठय़ा प्रमाणावर तस्करी सुरू असून त्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. विशेषत: महाराष्ट्रातील सिमावर्ती भागावरील सावळदा येथील वाळू घाटावर वाळूच नसतांना या घाटाच्या नावाने हजारो ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत असून यासंदर्भातील वास्तव चित्र प्रशासनासमोर येवूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे. तापी नदीतील वाळू ही बांधकामासाठी उत्कृष्ट मानली जाते. त्यामुळे या वाळूला थेट विदेशातही मागणी आहे. त्यामुळे येथील वाळूचे ठेके घेण्यासाठी अनेक बडय़ा मान्यवरांची स्पर्धा असते. यावर्षी देखील डिसेंबर 2017 मध्ये जिल्ह्यातील चार वाळू ठेक्यांचा निविदा काढण्यात आल्या होत्या. त्याअंतर्गतच सावळदा येथील वाळू घाटही मंजूर करण्यात आला आहे. सावळदा हे गाव गुजरातच्या हद्दीवरच आहे. दुसरीकडे गुजरातमध्येही तापी नदीवरच व्यावल, अंतुर्ली, निझर येथे ठेके देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात सावळदा घाटावर वाळूची उपलब्धता समाधानकारक नाही. असे असतांनाही गुजरातच्या ठेकेदाराने सावळदाच्या नावावर हजारो ब्रास वाळूची अवैध वाहतूक करीत असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची मध्यंतरी स्थानिक प्रशासनाने दखल घेवून पंचनामेही केले आहेत. प्राप्त माहितीनुसार, तहसीलदारांनी वस्तूस्थिती लक्षात घेवून सावळदा येथील ठेका रद्द करण्याबाबतही जिल्हा प्रशासनाला कळविल्याचे विश्वसनीय वृत्त आहे, दुसरीकडे वाका चौफुलीपासून तर व्यावलर्पयत मुख्य रस्त्यावरून प्रवास केल्यास या भागात लाखो ब्रास वाळूचे ढिगारे दिसून येतात. वाका चार रस्ता ते नंदुरबार तसेच वाका चार रस्ता ते प्रकाशा या रस्त्यावर रोज शेकडो वाळूचे डंपर ये-जा करतांना दिसतात. विशेष म्हणजे ही वाहतूक करतांना नियमाचे पालन होत नाही. वाहनातील वाळू झाकली जात नसल्याने ती वाळू उडते. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना त्याचा प्रचंड फटका बसतो. रस्त्यावरच मोठय़ा प्रमाणावर वाळू पसरत असल्याने वाहनेही त्यावरून घसरतात त्यातून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. दोन दिवसांपूर्वीच याच कारणाने एका दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. रोज दिवसाढवळ्या राजरोसपणे वाळूची ही तस्करी सुरू असतांना त्याबाबत कुठलीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेषत: वाळू वाहनांमुळे वाहनधारकांचे होणारे हाल आणि त्यामुळे होणारे अपघात यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाळू माफियांची मुजोरी वाढली असून अधिका:यांना धमकवणे, त्यांचे अपहरणाचे प्रकारही घडले असून याबाबत पोलिसांमध्ये तक्रारी देखील आहेत. असे असतांनाही या माफियांवर कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती नाराजीचा सूर आहे.
महाराष्ट्राच्या नावाने गुजरातमधून हजारो ब्रास वाळूची अवैध वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:38 PM