नंदुरबार : वाळू वाहतूक प्रकरणी जप्त केलेला मालट्रक जिल्हाधिकारी कार्यालय आवारातून ट्रक मालकानेच पळवून नेल्याची फिर्याद तलाठींनी दिली आहे. त्यावरून मालट्रक मालकाविरुद्ध १२ लाखांचा मालट्रक व १८ हजार ६०० रुपयांची वाळू चोरीप्रकरणी नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ जानेवारी ते १ जानेवारी दरम्यान ही घटना घडली.
पोलिस सूत्रांनुसार, वाळू वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने कारवाई करीत १२ चाकी व १२ लाख रुपये किमतीचा मालट्रक व त्यातील १८ हजार ६०० रुपये किमतीची ३१ टन वाळू जप्त केली होती. मालट्रक (क्रमांक एमएच २१ बीएच १०२६) वाळूसह जिल्हाधिकारी कार्यालय आवारात उभा करण्यात आला होता. २५ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान मालट्रक कुणीतरी तेथून पळवून नेला. १ जानेवारी रोजी ही बाब उघड झाल्यावर शोधाशोध झाली. अधिक चौकशी करता मालट्रक मालक विनोद विठ्ठल वर्दे (३५) रा. टाकळी, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर यांनीच तो पळवून नेल्याची फिर्याद तलाठी जयेश सुभाष सिंग राऊत यांनी दिली. त्यावरून जयेश राऊत यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात १२ लाखाचा मालट्रक आणि १८ हजार ६०० रुपयांची वाळू चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार विकास गुंजाळ करीत आहे.