नंदुरबार : सातबारावर नाव लावून देणे व त्यावर सहीशिक्का करण्यासाठी शेतकऱ्याकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारतांना तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सोमवार, ३ जुलै रोजी अमलपाडा, ता.तळोदा येथे ही कारवाई करण्यात आली. नंदलाल प्रभाकर ठाकूर (४४) तलाठी, अमलपाडा, ता. तळोदा असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
अमलपाडा येथील शेतकऱ्याने जमिनीचा गाव नमुना सातबारावर नाव नोंद करून मिळावे व तसा सातबारा सही शिक्क्यानिशी द्यावा, अशी मागणी तलाठी ठाकूर यांच्याकडे केली होती. तलाठ्याने सर्व कागदपत्र तपासणी करून सातबारावर नाव लावून दिले. त्यासाठी मात्र पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार देण्याचे ठरले. ३ जुलै रोजी सकाळी अमलपाडा येथे स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली. तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राकेश चौधरी, निरीक्षक माधवी वाघ, समाधान वाघ, हवालदार विजय ठाकरे, विलास पाटील, ज्योती पाटील, देवराम गावित, मनोज अहिरे, अमोल मराठे, जितेंद्र महाले यांनी केली.