नंदुरबार : शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये असलेले एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी यातून १८ हजार ४०० रुपये चोरून नेले. ३ ते २६ एप्रिलदरम्यान तीन वेळा हा प्रकार झाला. चौकशीअंती याबाबत शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'
सीसीटीव्हीत तीन व्यक्ती दिसत असून, पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली आहे. पोलिस सूत्रांनुसार, नंदुरबारातील मुख्य चौकात असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये आयडीबीय बँकेचे एटीएम आहे. या मशीनच्या पैसे निघण्याच्या शटर डिस्पेंसर तोडून ३, १८ व २६ एप्रिल रोजी पैसे काढण्याचा प्रयत्न झाला. ३ एप्रिल रोजी २,३०० रुपये, १८ एप्रिल रोजी दोन हजार आणि २६ एप्रिल रोजी आणखी काही पैसे असे एकूण १८ हजार ४०० रुपये काढून घेतले.
सीसीटीव्हीत १८ ते १९ वयोगटातील तीन तरुण पैसे निघण्याच्या ठिकाणी स्टील पट्टी टाकून तसेच कॅश डिपॉझिट बीएनए मधूनदेखील पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.याबाबत कर्मचारी भूषण मुकुंद विश्वंभर यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर करीत आहे.