नंदुरबार : मजुराला उचल म्हणून दिलेले तीन हजार रुपये परत केले नाही म्हणून मुकादम असलेल्या दोघांनी मजुराला विहिरीत ढकलून देत त्याचा खून केल्याची घटना ५ जून रोजी तलवाडेखुर्द, ता. नंदुरबार शिवारात घडली होती. याप्रकरणी २८ जुलै रोजी नंदुरबार तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत बुधा ठाकरे (४०, रा. कोळदा, ता. नंदुरबार, हल्ली मुक्काम वासदरे, ता. नंदुरबार) असे मयताचे नाव आहे. ठाकरे यास ऊसतोड मुकादम असलेले किसन सुदान ठाकरे (३१, रा. शनिमांडळ) व पांड्या उर्फ पांडू भिल (३८, रा. नवागाव - इंद्रीहट्टी, ता. नंदुरबार) यांनी कामाची उचल रक्कम म्हणून तीन हजार रुपये दिले होते. ती
रक्कम दोन मुकादम यांनी परत मागितली. परंतु, वसंत ठाकरे हा ती रक्कम देऊ शकला नाही. त्यामुळे त्याला ५ जून रोजी तलवाडे खुर्द शिवारातील हिंमतसिंग गिरासे यांच्या शेतात त्याला गाठून वाद घातला. वादातूनच त्याला जवळच्या विहिरीत ढकलून दिले. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत तेजाबाई वसंत ठाकरे यांनी फिर्याद दिल्याने २७ जुलै रोजी रात्री नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अविनाश केदार तपास करीत आहेत.