नंदुरबार येथील हातोडा रस्त्यावरील जोगेश्वरी माता मंदिराजवळ कै. मोहन सहादू माने व कै. कमलबाई मोहन माने (कुढावद) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भानुदास मोहन माने व किशोर मोहन माने यांनी स्वखर्चाने श्री इच्छापूर्ती साईबाबा मंदिराची उभारणी केली आहे. या मंदिरात श्री साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठाना सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम झाले. पहिल्या दिवशी साईबाबा मूर्तीची कलश शोभायात्रा काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रायश्चित संकल्प, गणपती पुण्याहवाचन, मातृकापूजन, आयुष्य मंत्र, नांदीश्राद्ध, मंडप स्थापन, अग्नी स्थापन अरणी मंथन, मूर्ती जलाधिवास, विविध मंडल देवता स्थापन, हवन कर्म, मूर्ती न्यास, धान्याधिवास, शय्याधिवास, सायंपूजन व आरती करण्यात आली. १६ सप्टेंबरला प्रात पूजन, मूर्ती दशविध व स्नान, मंदिर स्नपन विधी, प्रधान हवन, उत्तरांग हवनकर्म, कलशारोहण, ध्वजारोहण, मूर्ती प्राणप्रतिष्ठा कर्म, पूर्णावती, महाआरती व महाप्रसाद वाटपाने सांगता झाली. मंदिरावर कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठा परमपूज्य संत ब्रह्मलीन श्री रामचैतन्य बापू यांचे मानसपुत्र व खेतिया येथील श्रीकृष्ण गोशाळेचे परमपूज्य संत श्री संतोष चैतन्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याचे पौराहित्य शहादा येथील भागवताचार्य हर्षल राजेंद्र कुलकर्णी (खरवडकर), प्रवीण राजेंद्र कुलकर्णी, स्वप्निल वैद्य, गणेश भट, प्रणव कुलकर्णी, भावेश भट, आदींनी केले. कार्यक्रमास साईभक्त उपस्थित होते.
नंदुरबार येथे साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:31 AM