लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा नगरपरिषदेतर्फे नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत चार कोटी २५ लाख रूपांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन शहरातील विविध ठिकाणी करण्यात आले. या विकास कामांमुळे शहरात नागरिकांना चांगल्या दर्जाच्या पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत.नगरोत्थान अभियानांतर्गत तळोदा शहरात विकास कामांना मंजुरी मिळाली होती. त्यात चिनोदा चौफुली ते बिरसा मुंडा चौक रस्ता व दुभाजकाचे दोन कोटी, देशपांडे फोटो स्टुडिओ ते बस स्टॅण्डपर्यंत रस्ता तयार करणे ७५ लाख, हातोडा नाका ते खर्डी नदी पुला पावेतो गटारी व रस्ते ६६ लाख व खिरणी हट्टी रस्ता व गटारी १२ लाख रूपये अश्या चार कोटी २५ लाख रूपयांच्या विविध विकास कामांचा समावेश होता. नगराध्यक्ष अजय परदेशी व शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. या वेळी भाजपचे प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, नगरपालिका मुख्याधिकारी सपना वसावा, भाजपा शहर अध्यक्ष योगेश चौधरी यासह नगरसेवक भास्कर मराठे, रामानंद ठाकरे, अमानुद्दीन शेख, नगरसेविका अंबिका शेंडे, अनुपकुमार उदासी, प्रदीप शेंडे, हेमलाल मगरे, जालींधर भोई, सुरेश पाडवी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आनंद सोनार यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत व मास्क लावून उपस्थित होते.तळोदा शहरातील बस स्टँड जवळील बिरसा मुंडा चौकात भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी व अजय परदेशी यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी प्रा.विलास डामरे, प्रफुल्ल बुद्धीसागर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राजपूत, आनंद सोनार, आदींसह पदाधिकारी, हितचिंतक व कार्यकर्ते उपस्थित होते.नगरपरिषदेच्या नगरोत्थान निधींतर्गत शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी न्यु हायस्कूल जवळ सुसज्ज असा हॉल साकारला जात आहे. यासाठी ८८ लाख रूपये निधी मंजूर झाला असून, काही महिन्यातच त्याचेदेखील लोकार्पण केले जाणार आहे. तसेच मीरा कॉलनी येथे लॉन बनविण्यात येणार आहे. यासाठी एक कोटी आठ लाख रूपये, भगवान सीताराम नगर येथील आदिवासी सांस्कृतिक भवन वॉल कम्पाऊंड व गार्डन यासाठी ६६ लाख रूपये निधी मंजूर झाला असून, ही कामेदेखील प्रगतीपथावर आहे.या शहराच्या विविध विकास कामांमुळे शहराची वाटचाल ही प्रगतीपथाकडे होताना दिसत असल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.शहाद्याकडून तळोदा शहरात प्रवेश करताना नगर पालिकेच्या वतीने प्रवेशद्वाराचे बांधकाम करण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराला तळोदा तालुक्यासह गुजरात व मध्य प्रदेशातील आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत असणाऱ्या रंजनपुर (मोरवड), ता.तळोदा येथील संत श्री गुलाम महाराज असे नामकरण करण्यात आले आहे. प्रवेशद्वाराचे लोकार्पण आमदार राजेश पाडवी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, भाजप तळोदा शहराध्यक्ष योगेश चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र चंद्रसेन पाडवी, प्रेम पाडवी, भाजपचे माजी जिल्हाध्यश नागेश पाडवी, तळव्याचे माजी सरपंच नारायण ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश केदार, माजी जि.प.सदस्य सुनील चव्हाण, शहादा तालुका भाजपाचे अध्यक्ष डॉ.किशोर चव्हाण, आमदार पाडवींचे स्वीय सहाय्यक प्रा.विलास डामरे, वीरसिंग पाडवी, पालिकेचे आरोग्य निरक्षक अश्विन परदेशी आदींसह पालिकेचे नगरसेवक, नगरसेविका व आप धर्माचे अनुयायी उपस्थित होते.
तळोद्यात चार कोटींच्या कामांचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:48 PM