नवापूर : उकाई धरणाच्या फुगवट्यातील पाणी व तालुक्यातील करंजवेल शिवारातील सरपणी नदीच्या संगमावर अवैधरित्या वाळूचे उत्खनन करणारे केंद्र मोठ्या पोलीस बंदोबस्तात महसूल प्रशासनाकडून उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत एक ते दीड कोटी रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.उपविभागीय अधिकारी निमा अरोरा, तहसीलदार प्रमोद वसावे यांनी महसूल प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी स्थानिक पोलीस यांच्यासह तापी जिल्हा पोलिसांचे सहकार्य घेत आज दुपारी एक वाजेच्या सुमारास करंजवेल शिवाराजवळ ही कारवाई केल्याची माहिती तहसीलदार प्रमोद वसावे यांनी दिली. सरमणी नदीचे पाणी तथा उकाई धरणाचे नारायणपूर-काकरघाट जवळील फुगवट्याचे पाण्याचे संगमस्थान असलेल्या ठिकाणी अवैधरित्या वाळूचे उत्खनन सुरू आहे. या ठिकाणी पाण्याची खोली जास्त असल्याने बोटीच्या साह्याने स्वच्छ धुतलेल्या वाळूचा उपसा करण्यात येत होता. ही वाळू दर्जेदार असल्याने सुरत, मुंबईसह अनेक ठिकाणी या वाळूचा पुरवठा होत होता. उपविभागीय अधिकारी निमा अरोरा यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आज ही कारवाई करण्यात आली.तहसीलदार प्रमोद वसावे, पोलीस निरीक्षक रामदास पाटील यांनी पाण्याच्या प्रवाहातून आठ ते दहा कि.मी. अंतर बोटीने प्रवास करून वाळू उत्खनन करणाºयांना पकडण्यासाठी पाठलाग केला. मात्र सर्व संशयित पळून जाण्यात यशस्वी ठरले. प्रशासनाकडून एकूण सात बोटी जप्त करण्यात आल्या. गुजरात पोलिसांनी दोन बोटी ताब्यात घेतल्या. वाळूचा प्रत्यक्ष उपसा करण्यासाठी कार्यान्वित केलेली यंत्रणा जागेवरून काढण्याचे कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यात साहित्य लोखंडी पाईप, गाळणी, विद्युत जनित्र, होडी व इतर साधनांचा समावेश आहे. या कारवाईत एक ते दीड कोटी रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला जात असल्याचे तहसीलदार प्रमोद वसावे यांनी सांगितले. या कारवाईत पुरवठा निरीक्षक मिलिंद निकम, वळवी, साळुंखे, मंडळ अधिकारी व तलाठी सहभागी झाले. निमा अरोरा यादेखील सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळी थांबून होत्या.यापूर्वीदेखील या भागात दोन वर्षांपूर्वी मोठी कारवाई करण्यात आली होती. त्या वेळीदेखील मोठमोठ्या व अवजड मशीनरी जप्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या भागात अवैध वाळू उत्खनन करण्यासाठी कुणाचा कृपाशीर्वाद आहे. कुणाचे पाठबळ आहे याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या वाळू व्यवसायावर कडक निर्बंध लावावे, येथील अवैध वाळू उत्खनन कायमस्वरूपी थांबवावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)अनेकांची नजर४१९६१ साली मुंबई प्रदेश विभाजित झाल्यानंतर महाराष्टÑ गुजरात राज्यांची स्वतंत्र निर्मिती झाली. नदी व धरणातील फुगवट्याचे पाणी या दोन राज्यांच्या सीमेसाठी अडथळा ठरत आले आहे. वर्षानुवर्षे पाण्याखाली हा भाग राहिल्याने वाळूचा मुबलक साठा उपलब्ध होत असल्याने अवैध वाळू वाहतुकीसाठी हा भाग उपयुक्त ठरत आला आहे. पाण्याच्या याच पट्ट्यावर यापूर्वीही प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.
करंजवेलला अवैध वाळू उत्खननावर धाड
By admin | Published: April 06, 2017 12:47 AM