लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यभरात असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण कार्यक्रम सुरू आहे. या अंतर्गत नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागाकडून ग्रामीण व शहरी भागात आशा सेविकांकडून एनसीडीअंतर्गत सर्वेक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या स्क्रीनिंग करण्यावरून आरोग्य कर्मचारी व प्रशासन यांच्या जुंपली आहे. यातून आरोग्य सेविकांसह सीएचओंनीही टॅबद्वारे माहिती भरलेली नसल्याचे समाेर आले आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून एनसीडी कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागात मधुमेह, ब्रेस्ट कॅन्सर, हायपर टेन्शन यासह विविध असंसर्गजन्य रोगांचे सर्वेक्षण आशा सेविकांकडून करून घेण्यात येत आहे. देण्यात येणाऱ्या रिपोर्टच्या आधारे आशा सेविकांकडून संबंधित रुग्णांची माहिती ऑनलाइन भरण्यात येणार आहे. या माहिती आधारे कम्युनिटी मेडिकल ऑफिसर व मेडिकल ऑफिसर यांच्याकडून संबंधित रुग्णावर उपचार करणे तसेच गंभीर रुग्ण असल्यास त्याला पुढील उपचारासाठी पाठवण्याची कारवाई होणार आहे. दरम्यान, ही कामगिरी करण्यासाठी १ हजार ८०० पेक्षा अधिक आशा तैनात आहेत; परंतु आरोग्य सेविकांची मात्र संख्या तेवढी नसल्याने त्यांच्या कामांमध्ये अडथळे येत आहेत. सेविकांकडून गेल्या सात महिन्यांत कोरोनाकाळातील विविध कामांसह ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ तसेच सीसीसी सेंटरवर १५ दिवस कर्तव्य बजावण्यात येत होते. माता व बालसंगोपन ही प्रमुख जबाबदारी असलेल्या सेविकांवर या कामामुळे बाेजा वाढल्याने आरोग्य विभागातील वरिष्ठ तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत या कामातून सूट देण्याची विनंती केली होती; परंतु अधिकाऱ्यांनी याउलट संबंधित सेविकांना विनावेतन काम करण्याची नोटीस दिल्याची माहिती आहे. नोटिसा मिळाल्याने सेविकांकडून पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान एकीकडे सेविका आणि आरोग्य प्रशासन यांच्यात चर्चा सुरू असताना आरोग्य विभागाने हे काम सामूहिक असल्याने पुरुष आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांनी स्क्रीनिंग करण्याचे आदेश काढल्याची माहिती आहे. यातून सुमारे १ हजारपेक्षा अधिक कर्मचारी कामाला लागणार असल्याने एनसीडी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याची कामगिरी उंचावणार आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. एन.डी. बोडके यांच्याशी संपर्क केला असता, जिल्ह्याची कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे. सेविकांवरचा बोजा कमी व्हावा यासाठी अधिकारीवर्गाकडून प्रयत्न सुरू आहे. सर्वांनी मिळून या कार्यक्रमात सहभाग घेण्याबाबतचे आदेश काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर जिल्ह्यात सेविका एनसीडीतून मुक्त दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातच एनसीडी सर्वेक्षणासाठी सेविकांना पाठवले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील इतर भागात ही कामे इतरांकडून करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सेविकांकडून ही जबाबदारी देवू नये यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.