मनोज शेलार, नंदुरबार: राज्यातील उद्योग गुजरातमध्ये पळविले जात असल्याचा वावड्या उठवल्या जातात, परंतु गुजरातमधील उद्योग राज्यात येत असल्याचे उदाहरण हे नवापुरातील टेक्स्टाइल पार्कमधील उद्योगातून स्पष्ट होते. नवापूरच्या टेक्स्टाइल पार्कमध्ये गुजरातमधील उद्योजकांची गुंतवणूक हेच विरोधकांना चोख उत्तर असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
नवापूर येथील एमआयडीसीमध्ये जनरल पॉलिफिल्म लिमिटेड कंपनीच्या सुमारे ८०० कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन, जिल्हा औद्योगिक विकास महामंडळाची आढावा बैठक तसेच नवापूर टेक्सटाइल इंडस्ट्रीयल असोसिएशनसोबत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, आपल्या सरकारच्या काळात राज्यातील उद्योगांना त्यांच्या कामासाठी कुठल्याही प्रकारचे फेऱ्या व हेलपाटे न मारता जागेवरच आजपर्यंत सुमारे साडेसात हजार कोटींचा इन्सेंटिव्ह दिला आहे. गुजरात राज्यातील उद्योग महाराष्ट्राच्या या नवापूरसारख्या आदिवासीबहुल, छोट्या तालुक्यात टेक्स्टाइल पार्कमध्ये गुंतवणूक करताहेत, त्यामुळे या टेक्सटाइल पार्कमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करणाऱ्या गुजरातसह देशातील सर्व उद्योजकांना जास्तीत जास्त इन्सेंटिव्ह देण्याचा व सर्व समुदायांच्या लोकांना गुंतवणुकीसोबत रोजगार देण्याचाही प्रयत्न महाराष्ट्र् शासनाचा असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यातील उद्योग विकासासाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे असल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.