लोकमत न्यूज नेटवर्ककोंढावळ : खापरखेडा धरणाला पडलेले भगदाड धोकेदायक असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन महसूल विभागाच्या कर्मचा:यांनी भेट देऊन पाहणी केली. मात्र या वेळी पाटबंधारे विभागाचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता.खापरखेडा धरणाच्या मेनगेटजवळ पडलेले भगदाड धोकेदायक असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन सोमवारी तलाठी जयवंत पाटील, रघुनाथ रामराजे, ग्रामसेवक प्रदीप पाटील यांनी धरणावर जाऊन पाहणी केली. या वेळी पाटबंधारे विभागाचा कुणीही कर्मचारी उपस्थित नसल्याने या विभागाला धरणाला पडलेल्या धोकेदायक भगदाडाबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येते. एक-दोन दिवस झालेल्या पावसाने धरणाची पातळी वाढली आहे. पावसाळ्याचे अजून दोन महिने बाकी असून पाणी पातळीत वाढ झाली तर या भगदाडामुळे अनर्थ घडू शकतो. त्यामुळे नदीकाठावरील गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महसूल विभागाचे कर्मचारी धरणाची पाहणी करू शकतात मात्र पाटबंधारे विभागाला याबाबत गांभीर्य नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी पाटबंधारे विभागाला आदेश देऊन या धरणाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
खापरखेडा धरणाची महसूल विभागाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 11:43 AM