नंदुरबार : हवामानाधारित शेती करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांत सोयाबीनच्या रूपाने आशेचा किरण सापडला आहे. यातून दरवर्षी सोयाबीनचा पेरा वाढत असून प्रत्येक वर्षात पाच हजारांनी सोयाबीन पेरणीक्षेत्र वाढले आहे.
जिल्ह्यात पावसाची दरवर्षी कमी-अधिक प्रमाणातील हजेरी शेतकऱ्यांना तापदायक ठरत आहे. यंदा पावसाने वेळेवर हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांना दुबार आणि तिबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले होते. धान्य आणि कडधान्य पीक उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनघटीचा सामना करावा लागत आहे. हीच स्थिती दर दोन वर्षांनी उद्भवत असल्याने शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत आहेत. यातून झटपट, मध्यम आणि लवकर येणारे सोयाबीन पेरा केला जात आहे. यातून शेतकऱ्यांना शेतीतील खर्च कमी होऊन संगोपनाचा खर्चही कमी येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
लवकर येणारे सोयाबीन काढणीनंतर बाजारात सोयाबीनची आवक कमी असते. त्यामुळे भाव चांगला मिळतो. शेत मोकळे झाल्याने शेतकरी इतर पिकांचे नियोजन करू शकतात. सोयाबीन काढल्यानंतरही जमिनीत ओलावा टिकून राहत असल्याने अनेकांना बाजरीचे नियोजन केले जाते.
शेतकऱ्यांनी तीन प्रकारचे सोयाबीन घ्यावे. त्यामध्ये लवकर, मध्यम आणि उशिरा असे नियोजन करावे. त्यामुळे पाऊस केव्हाही आला तरी शेतकऱ्यांना सोयाबीन चांगले उत्पन्न देऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. ९५६० आणि २०३४ हे वाण ८५ दिवसांत, तर ९३०५ हे वाण ८७ दिवसांत येतात. वेगवेगळ्या प्रकारचे वाण उपलब्ध आहेत.
शेती हा व्यवसाय खूप महागला आहे. पाऊस हा भरवशाचा राहिला नाही. यामुळे मग सोयाबीनसारख्या पिकांकडे कल वाढला आहे; परंतु साेयाबीनलाही पाण्याची गरज आहे. शेंगा भरतील एवढा पाऊस झाल्यास त्याचे उत्पादन बाजारात उतरवून लागवडीचा खर्च वसूल होऊ शकतो.
- विजय रामजी चाैधरी, शेतकरी.
सोयाबीनलाही खर्च येतो. उत्पादन झटपट येत असले तरी त्यासाठी काळजी घ्यावी लागते. माझ्या शेतात पेरणी केलेल्या सोयाबीनची स्थिती चांगली आहे. तीन वेळा फवारणी करण्यात आली आहे. येत्या काळात पाऊस चांगला झाल्यास पिकांच्या वाढीस लाभ होणार आहे.
- रमण देविदास चाैधरी, शेतकरी.
शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत इतर पिकांचा आधार घेत आहेत. सोयाबीन हे अधिक उत्पादन मिळवून देणारे पीक आहे. यामुळे दरवर्षी त्याचा पेरा हा वाढत आहे. शेतकरी बांधवांनी योग्य वाणाची पेरणी केली पाहिजे. योग्य ते बियाणे तपासून खरेदी करावेत.
- प्रदीप लाटे,
कृषी विकास अधिकारी, नंदुरबार.