नंदुरबार तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार आता केवळ चारच दिवसांचा राहिला आहे. यासाठी प्रभागनिहाय लढती देणारे उमेदवार पूर्ण जोर लावत आहेत. यात सर्वाधिक विशेष बाब म्हणजे तालुक्यात भालेर व कोपर्ली या दोन मोठ्या ग्रामपंचायती लक्ष्यवेधी आहेत. यातील भालेर परिसरात फिरत असताना हाैशी उमेदवार आणि उत्साही कार्यकर्ते यांची चंगळ सुरू आहे. प्रभागात फेऱ्या काढून निवडी द्या, असे दात काढत मत मागणाऱ्यांना महिलावर्गाकडून टोमण्यांचा प्रसादही मिळत आहे. गावातीलच एकमेकांचे नातेवाईक असल्याने हे सर्व मजाकमध्ये घेत वेळ निभावून नेली जात आहे. एका प्रभागात चार-पाच जणांचा घोळका फिरत असताना त्याना मांगे फिरापेक्षा घर बठा, असा सल्ला एका म्हाताऱ्या आजोबांनी दिला. त्यावर प्रतिक्रिया देत एका उत्साही कार्यकर्त्याने घर बी रिकामं बठान शे.. मग याना मांगे फिरामा काय वाईट, असे उत्तर दिल्यानंतर एकच खसखस पिकली.
उत्साही उमेदवारांची होतेय फसगत
शहरी भागात कोणीच विचारत नसल्याने अनेकांनी गावाचा रस्ता धरून त्याठिकाणी राजकारणात नशीब आजमावण्याचा नवीन पायंडा पाडला आहे. यातून दर पाच वर्षांनी गावात अचानक नव्याने भाऊ, दादा भावी सरपंच म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. गावात एखाद दुसरा भंडारा आणि शहरातील नेत्यांची ओळख असल्याचे सांगून गावात बडेजाव करण्यात हे उत्साही धन्यता मानत आहेत. यातील एक सध्या शहरातून एका पक्षाने निर्यात करून गावातील निवडणुकीत उभा केला आहे. उमेदवारही तगडा असल्याने खर्चाचा हात सध्यातरी ढिला झाला आहे. परंतु गावात फिरत असताना गावात नंदीबैल यावा तसा त्याला पाहायला झुंबड उडत आहे. यात घरोघरी नमस्कार करत पाया पडत असताना अनेकजण प्रश्न हमखास विचारतात. तो म्हणजे भाऊ तू कोना पोरगा शे... हा प्रश्न विचारल्यानंतर उमेदवार उत्तर देतो खरं. पण मग पुढचा गावकीतला प्रतिप्रश्न उमेदवारालाच खजील करणारा ठरतो. तो म्हणजे तठे काय काम नई व्हतं का, भाऊ आठे निवडणूक मा उभा राह्यना ते..
काय बी करा पन मतदानले या..
शहादा तालुक्यातील काही गावात प्रचाराची रंगत चांगलीच रंगली आहे. यात प्रामुख्याने गेल्या तीन-चार वर्षात विवाह करून माहेरी स्थिरावलेल्या माहेरवाशिणींना घरी परत येण्याचे साकडे उमेदवार घालत आहेत. बहीन तू बी ये आनी दाजीले बी संगे लयी ये, भाडाना पैसा ऑनलाइन धाडी देतस असं सांगून त्यांची मनधरणी होत आहे.