कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा लागल्यानंतर यंदा तरी थाटात उत्सव साजरा होईल, अशी आशा सर्वांनाच होती; मात्र पहिल्या लाटेपाठोपाठ कोरोनाची दुसरी लाट आल्याने गणेशभक्तांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत राज्य सरकारने यंदाही गणेशोत्सवावरील निर्बंध कायम ठेवले आहेत. कोणतीही गर्दी न करता साधेपणाने गणेशोत्सव साजरे करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. या अनुषंगाने शहादा पोलीस ठाण्यात मूर्तिकार यांची बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांत सार्वजनिक मंडळाची गणेशमूर्ती पर्यावरणपूरक व चार फूट उंचीची तर घरगुती मूर्ती दोन फूट उंचीची तयार करण्याच्या सूचना संबंधित श्रीगणेश मूर्ती कारखानाधारकांना देण्यात आल्या. यावेळी मोरया आर्टचे योगेश पाटील, प्रवीण कुंभार, गिरीश पाटील, जितेंद्र पाटील, युवराज पाटील आदी उपस्थित होते.
शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचना संबंधित कारखानाचालकांना देण्यात आल्या असून, चार फूट उंचीच्या व पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती बनवण्याच्या सूचना संबंधित मूर्तिकारांना देण्यात आल्या, तसेच सार्वजनिक मंडळांनी चार फूट उंचीची गणेशमूर्ती स्थापन करून मंडप त्या अनुषंगाने छोट्या प्रमाणात उभारावा, जेणेकरून रहदारीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- दीपक बुधवंत, पोलीस निरीक्षक, शहादा.