लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुपोषण कमी करण्यासाठी बालविकास योजनेच्या विविध योजना व उपक्रम एकत्रितरित्या राबविण्यात यावे. जेणेकरून त्यात समन्वय ठेवता येईल अशा सुचना लोकप्रतिनिधींनी जिल्हा आढावा बैठकीत बोलतांना दिल्या.एकात्मिक बाल विकास सेवा योजनाअंतर्गत जिल्हास्तरीय संनियत्रंण व आढावा समितीची बैठक बुधवारी झाली. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवाडे, जिल्हा परिषद सभापती हिराबाई पाडवी, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक बागुल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनाअंतर्गत एकुण 12 प्रकल्प कार्यरत आहेत. त्यात एकुण दोन हजार 437 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. सर्व विभागांनी आपली जबाबदारी सुयोग्यरित्या पार पाडली तर कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यास नक्कीच मदत होईल अशी अपेक्षा यावेळी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली.यावेळी विविध विभागांनी माहिती दिली. 2016-17 मध्ये एकुण 132 अंगणवाडी इमारत बांधकामे मंजुर करण्यात आलेली आहेत. ती कामे त्वरीत पुर्ण करण्यात यावी. 2017-18 मध्ये अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील ज्या ठिकाणी अंगणवाडी केंद्रास इमारत नसतील त्या ठिकाणी सर्व इमारत बांधकामाचे प्रस्ताव सादर करून त्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी व इमारत बांधकामे करण्यात यावी अशा सुचनाही यावेळी देण्यात आल्या. अंगणवाडी केंद्रातील एकुण एक लाख 45 हजार 606 बालकांपैकी एक लाख चार हजार 97 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सर्व वैद्यकीय अधिका:यांनी नियमितपणे दरमहा बालकांची आरोग्य तपासणी करावी. सर्व बालकांना वेळेत अमृत आहार योजनेचे लाभ देण्यात यावे व सर्व अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षीका यांनी मुख्यालयी राहून नियमितपणे काम करावे. अंगणवाडी केंद्रांना बचतगटामार्फत सकस आहार पुरवठय़ाचे संनियंत्रण पर्यवेक्षिका यांनी करण्याच्या सुचना देखील यावेळी करण्यात आल्या.
कुपोषण मुक्तीसाठी योजनांची एकत्रीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:26 PM