नंदुरबार : तालुक्यातील कोपर्ली येथे गुंतवलेले पैसे परत मिळावेत म्हणून तगादा लावणाऱ्या गुंतवणूकदारांनी एजंटच्या दुकानाची तोडफोड करत पाच लाख रूपये किमतीचे सामान आणि सात हजार रूपये रोख लुटून नेल्याची घटना सोमवारी सकाळी घडली़ याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़कोपर्ली येथील ईश्वर मंगा साठे हे मैत्रेय कंपनीचे एजंट म्हणून काम पाहतात़ गेल्या काही वर्षांपासून कंपनी डबघाईला येऊन गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले आहेत़ या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी साठे यांच्या कार्यालयात गुंतवणूकदारांनी भेट देत पैसे परत करण्याची मागणी केली होती़ यावेळी शंतनू बिर्ला, ईश्वर बिर्ला, खुशालचंद गणपती बिर्ला, मणिकलाल बिर्ला, गोरख मंगा चौधरी यांनी सर्व रा़ कोपर्ली यांच्यासह काही जणांनी साठे यांच्या दुकानात घुसून जाळीचे कंपाउंड तोडून आतील भागात तोडफोड करत कपाटात ठेवलेले सात हजार रूपये आणि पाच लाख रूपये किमतीचे दुकानातील महागडे सामान चोेरून नेले़ या प्रकारामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता़ याबाबत सोमवारी उशिरा नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात ईश्वर साठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शंतनू बिर्ला, ईश्वर बिर्ला, खुशालचंंद बिर्ला, मणिकलाल बिर्ला, गोरख चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक जी़टी़ पवार करत आहेत़ फिर्यादी साठे हे भाजपा जिल्हाउपाध्यक्ष असून या वादाला राजकारणाची किनार असल्याचे बोलले जात आहे़ या प्रकाराने नंदुरबार तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे़
कोपर्लीत गुंतवणूकदारांनी एजंटाच्या दुकानाची तोडफोड करत सामान लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 7:04 PM