सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे येथे किरण सोनवणे हे सध्या कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते मूळचे साक्री येथील असून त्यांनी २००७ मध्ये पूज्य साने विद्या प्रसारक मंडळाच्या शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात प्रवेश घेऊन २०११ मध्ये बी.फार्मसी उत्तीर्ण झाले.
कोरोनाच्या प्रकोपापासून बचाव करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत. कोरोनाविरोधातील रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे व्हॅक्सिन तयार करण्यावर सर्वांचाच भर आहे. देशातही विविध ठिकाणी लस तयार करण्याचे काम सुरू होते. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील सोनवणे यांच्यासह लस तयार करणाऱ्या सर्व टीमचे मोठे योगदान आहे. त्या टीममध्ये किरण सोनवणे यांचाही समावेश आहे. संस्था आणि महाविद्यालयासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. महाविद्यालयाने अशा विद्यार्थ्यांची निर्मिती केली आहे की, ते मानवतेसाठी व जनकल्याणासाठी सेवा देत आहेत. त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे महाविद्यालयाला नावलौकिक प्राप्त झाला असून सोनवणे व त्यांच्या टीमचे कौतुक केले जात आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. पी.के. अण्णा पाटील हे मानव व देशसेवेत येथील विद्यार्थी सदैव अग्रेसर असावेत, यासाठी आग्रही होते. त्यांचे स्वप्न साकारण्यास येथील प्राध्यापक व विद्यार्थी नेहमीच प्रयत्न करीत असतात. किरण सोनवणे यांनी कौतुकास्पद कामगिरी करीत कोरोनापासून भयमुक्त होण्यासाठी लस तयार करण्याच्या कामाला प्रत्यक्ष हातभार लावला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
-दीपक पाटील, अध्यक्ष, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ
आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे आणि मला हे सांगण्यात खूप आनंद होत आहे की, आमच्या महाविद्यालयाने असे विद्यार्थी तयार केले, ज्यांनी या लसीच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आमचे माजी विद्यार्थी किरण सोनवणे यांनी या लसीच्या विकासात सक्रियपणे भाग घेतला आहे.
-प्राचार्य डॉ. एस.पी. पवार, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा