नंदूरबार - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंकजा मुंडेंना टार्गेट केले आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे विधान बालिशपणाचे असल्याची टीका आंबेडकर यांनी केली. तसेच आरक्षणाची फाईल म्हणजे चिक्कीची फाईल नव्हे. आरक्षणाबाबत असा एका मिनिटात निर्णय आणि सही होत नसते, असेही आंबेडकर यांनी नंदूरबार येथे बोलताना स्पष्ट केले.
शिवरायांची शप्पथ घेऊन सांगते, माझ्या टेबलावर मराठा आरक्षणाची फाईल असती, तर एका मिनिटात सही केली असती, असे वक्तव्य ग्रामविकामंत्री पंकजा मुंडे यांनी परळीतील मराठा आंदोलकांशी बोलताना केले होते. त्यानंतर, त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यभर चर्चा झडली. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही पंकजा मुंडेना एका तासासाठी मुख्यमंत्री करा, असा सल्ला दिला आहे. त्यानंतर, आता भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि दलित समाजाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही पंकजा मुंडेंना लक्ष्य केले. पंकजा मुंडेचे ते विधान बालिशपणाचे आहे, आरक्षणाच्या फाईलवर अशी एका मिनिटात सही किंवा निर्मण होत नसतो. आरक्षणाची फाईल म्हणजे चिक्कीची फाईल नाही, असा उपहासात्मक टोलाही आंबेडकर यांनी पंकजा मुंडेंना लगावला.