लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार/प्रकाशा : यंदा सरासरीचा २६ टक्के पाऊसची तूट असतांना शुक्रवारी रात्री धो-धो बरसला. शनिवारी देखील दिवसभर रिपरिप सुरू होती. यामुळे नदी, नाल्यांना पाणी आले असून लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, तापीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने सारंगखेडा बॅरेजचे पाच तर प्रकाशा बॅरेजचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यात यंदा वेळेवर पावसाचे आगमन झाले असले तरी अनियमित पावसामुळे तूट मोठ्या प्रमाणावर आहे. सरासरीचा २६ टक्के पाऊस कमी झाला आहे. जुलै अखेर ही तूट भरून निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभुमीवर शुक्रवारी रात्री अनेक भागात दमदार पाऊस झाला. नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक ६० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. तळोदा तालुक्यात ५०, शहादा तालुक्यात ३८, धडगाव तालुक्यात २२ तर अक्कलकुवा तालुक्यात आठ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी देखील दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.तापीकाठावर सतर्कतेचा इशारातापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पूर स्थिती निर्माण होणार आहे. पुढील ७२ तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.प्रकाशा बॅरेजच्या उर्ध्वभागात गोमाई नदीत सुमारे दीड मीटर उंचीने पाणी वाहत आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे २४ दरवाजे उघडले असून ३१,३६४ क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पाचे १० दरवाजे उघडले असून ३७ हजार क्युसेक्स विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील बोरी नदीला पूर आल्याने या नदीतील पाणी काही कालावधीत तापी नदीत दाखल होण्याची शक्यता असल्याने पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकाशा बॅरेजचे सहा दरवाजे दोन मीटर उंचीने उघडण्यात आले असून ३५,१६५ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर सारंगखेडा बॅरेजचे पाच दरवाजे तीन मीटर उंचीने उघडण्यात आले असून ४५,४९८ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याची पातळी नियंत्रित करण्याकरिता विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ७२ तासांसाठी नागरीकांनी नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. नदी काठावर असलेले उपसा पंप तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.४जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरीचा केवळ ३० टक्के पाणीसाठा आहे. या पावसामुळे पाणी साठ्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे.४जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस शहादा तालुक्यात सरासरीचा ४६ टक्के झाला आहे. तर सर्वात कमी पाऊस धडगाव तालुक्यात केवळ २२ टक्के झाला आहे.४जिल्ह्यातील पावसाची तूट अद्यापही २५ टक्केपेक्षा अधीक आहे. ती भरून काढण्यासाठी मुसळधार आण सातत्याचा पावसाची अपेक्षा आहे.
जिल्हाभरात धो,धो बरसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 12:39 PM