नंदुरबार येथील व्यापाऱ्याच्या घरात पडलेल्या दरोड्यातील संशयित टोळी ही नेपाळी असून टोळीतील पाचही जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मदत करणाऱ्या स्थानिक दोघांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
शुक्रवारी पहाटे विसरवाडी येथील व्यापारी भरत अग्रवाल यांच्या घरात दरोडा पडला होता. अग्रवाल दाम्पत्याला बांधून मारहाण केली व ऐवज बॅगेत भरला. अग्रवाल यांच्या मुलीने प्रसंगावधान राखत घरातून बाहेर पळ काढून नातेवाईक, शेजारी व पोलिसांना माहिती दिल्यानंतर पाचपैकी चार जणांना अटक करण्यात आली होती. पाचवा संशयित सुरत रेल्वे स्थानकावर सापडला. सर्व पाचही जण नेपाळी असून त्यांना मदत करणारे दोघे स्थानिक आहेत. एकूण सात जणांना पोलिसांनी अटक केली.
त्यात चक्र मिनराम सुनार उर्फ चेतन बहादुर सोनी (२९, रा. तातापाणी, ता. पंच्चुपुरी, जि. सुरखेत, नेपाळ, ह.मु. शिवनगर ब्लॉक क्र. ६ टिकापूर, जि. कैकाली, नेपाळ), हिक्करमल उर्फ हिमंत जनक शाही (२८, रा. सिरखानाता, राजकोट, जि. कालीकोट, नेपाळ), भरत धरमराज सोनी (सोनार) (२१, रा. मोहन्याल, जि. कैलानी, नेपाळ), राजू केरे विश्वकर्मा (३६, रा. सोडपाणी, ता. सुखल, जि. कैलानी, नेपाळ), तुफान उर्फ तप्तबहादुर दिनेशसिंग उर्फ दिनेश रावत (३१, रा. थाकालीपूर पो.स्टे., लम्की, जि. कैलाली, नेपाळ, ह.मु. कुरुभु रहाली, जैसी नगर, बंगळुरू, कर्नाटक)भाईदास साकऱ्या गावीत (३४, रा. बडीफळी नांदवन, ता. नवापूर, योहान जेनू गावीत (३८, रा. आंटीपाडा, ता. नवापूर) यांचा समावेश आहे.