नंदुरबार : राज्यातील राजकारण आणि सत्तेबाबत मुंबईत नेत्यांच्या प्रतिक्रियांमुळे संभ्रमाचे वातावरण असताना शनिवारी राज्याचे शेवटचे टोक असलेल्या शहादा येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी एकत्र आले होते. राजकीय नेत्यांचा ‘फ्रेण्डशिप वीकेंड’ जिल्हावासीयांनी अनुभवला. निमित्त होते लोणखेडा ता. शहादा येथील पी. के. अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाचे.
देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांनी कार्यक्रमस्थळी अभियांत्रिकी महाविद्यालयापासून एकाच गाडीत प्रवास केला, एकाच सोफ्यावर बसून दोघांनी नाश्ता केला, कार्यक्रमस्थळी एकाच सोफ्यावर बसून तब्बल तासभर गप्पा मारल्या.