नंदुरबार : अभियांत्रिकी पदविका अर्थात पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील पाच महाविद्यालयांसाठी प्रवेश प्रक्रियेचा पहिला राउंड पार पडला. पाचही महाविद्यालयांसाठी १ हजार २५६ जागांसाठी निवड प्रक्रिया सुरू होती.
नंदुरबार जिल्ह्यात पाच पाॅलिटेक्निक महाविद्यालये आहेत. यात एकूण १ हजार २५६ विद्यार्थ्यांची प्रवेशमर्यादा आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाॅलिटेक्निकची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या प्रक्रियेंतर्गत पाच महाविद्यालयांतील हजार जागांसाठी अडीच हजार अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे. या महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रियाही एक महिन्याच्या कालखंडात पूर्ण होईल अशी अपेक्षा असून त्यानंतर शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना पाॅलिटेक्निक शाखेत प्रवेश घेण्यासाठी शासकीय महाविद्यालय प्रशासनाकडून यंदा विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या काळात शासनाच्या विविध शाखांमध्ये अभियंत्यांची पदे रिक्त होणार असल्याने नाेकरीची सुसंधी असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना आकर्षित केले जात आहे. महाविद्यालयाच्या संकेतस्थळावरच तशी माहिती दिली गेली आहे. इतर चार महाविद्यालयांमध्येही विद्यार्थी प्रवेशित व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तर दुरुस्ती करता येणाऱ़़
प्रवेश प्रक्रियेंतर्गत १९ ते २२ सप्टेंबर या कालावधीतील विद्यार्थ्यांना स्वत:ची कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने पडताळणी करावयाची आहे. त्यामुळे कागदपत्रांची तपासणी करून काही त्रुटी आढळून आल्यास त्या दुरुस्त करता येतील.
त्याशिवाय १९ ते २३ सप्टेंबर याच कालावधीत विद्यार्थ्यांनी पडताळणी पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रवेश घेता येणार आहे. त्यानंतर २४ सप्टेंबरपासून दुसऱ्या कॅपराऊंडला सुरुवात हाेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्राचार्य म्हणतात...
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना पाॅलिटेक्निक शाखा लाभदायक ठरू शकते. त्यादृष्टीने प्रयत्न करुन विद्यार्थ्यांचे प्रवेश करुन घेणार आहे. सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांनीही पाॅलिटेक्निक शाखेकडून चांगले करियर म्हणून पाहावे. जिल्ह्यात शासकीय महाविद्यालयातून चांगले विद्यार्थी घडावे यासाठी सातत्याने प्रयत्न राहील.
- एस. बी. पाबले, प्राचार्य, शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालय
कॉम्प्युटरची आवड आहे. यामुळे याच क्षेत्रात करियर करण्याचा मानस आहे. आई-वडिलांसोबत विचारविनिमय करून निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रवेशासाठी अर्ज केला होती. शनिवारी प्रवेश निश्चितीची शक्यता आहे.
- अभिनव पाटील, विद्यार्थी
मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलकडे विद्यार्थ्यांचा ओढा
पॉलिटेक्निक महाविद्यालयातील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल व संगणक अभ्यासक्रमाकडे सर्वाधिक विद्यार्थ्यांचा ओढा आहे. उर्वरित अभ्यासक्रमांना कल कमी असतो.