शहादा तालुक्यातील २१, नंदुरबार व तळोदा तालुक्यात प्रत्येकी सात, धडगाव १६, नवापूर १२, तर अक्कलकुवा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. १५ रोजी होणाऱ्या या मतदानप्रक्रियेपूर्वी उमेदवारांचा प्रचार जोरदारपणे सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात नात्या-गोत्यात लढतींची संख्या यंदा कमी आहे. नंदुरबार ताुलक्यातील कंढ्रे येथील भाऊबंदकीच्या लढतींकडे लक्ष लागून आहे. गाव म्हटले की, सगळेच एकमेकांचे नातलग असल्याने एकाच प्रभागात चुलत भाऊ, चुलत्यांची मुले आदी एकमेकांच्या विरोधात उमेदवारी करत असल्याचे चित्र येथे दिसून आले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी एकाच कुटुंबातील दोन ते तीन जण, असेही रिंगणात आहेत.
कंढ्रेत काका-पुतणे
कंढ्रे ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराला नुकतीच सुरुवात झाली आहे. यात प्रभाग दोनमध्ये काका पुतणे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत असल्याने संपूर्ण गाव आणि पर्यायाने तालुक्याचे लक्ष याठिकाणी लागून आहे. वेगवेगळ्या पॅनलमधून हे काका पुतणे उमेदवारी करत असल्याचे दिसून आले आहे. या लढतीची मोठी चर्चा आहे.
सख्खे चुलत भाऊही..
नंदुरबार तालुक्यातील चर्चित ग्रामपंचायत कंढरे येथील निवडणुकीत एका प्रभागातून सख्खे चुलत भाऊही एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यांच्याकडून एकमेकांना दिल्या गेलेल्या आव्हानानंतर गावात याची बरीच चर्चा होती. निवडणुकीचा नेमका निकाल काय लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राजकीय पक्ष पुरस्कृत ही लढत आहे.
कोपर्ली व हाटमोहिद्याकडे लक्ष लागून
दरम्यान, एकीकडे तालुक्यातील एका गावात भाऊबंदकीत लढती असताना दुसरीकडे कोपर्ली आणि हाटमोहिदा गावात एकाच कुटुंबातील उमेदवारही निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. यात प्रामुख्याने कोपर्ली येथे पत्नी एका प्रभागात, तर पती दुसऱ्या प्रभागात निवडणूक लढवित आहेत. हाटमोहिदे येथे नणंद-भावजयी निवडणूक लढवत आहेत. एकत्रित निवडणूक लढवत असल्याने हे सर्वच एकमेकांना प्रचारातही मदत करत आहेत.