जिल्हाभरातून क्रीडा क्षेत्रात खेळांडूनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मजल मारली आहे. मात्र मैदानाची दुरवस्था झाली असल्याने हे खेळाडू सध्या महाविद्यालयामध्ये सराव करताना दिसून येत आहे. खेळाडूंना योग्य मैदानाची आवश्यकता असल्याने मात्र जिल्हा क्रीडा संकुल विभागाकडून या मैदानावरील दुरवस्था व अस्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने भविष्यात तयार होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंचे नुकसान होत आहे.
तालुका क्रीडा संकुल मैदानावर कचरा पसरलेला असून या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे डासाचे प्रमाण वाढल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या मैदानालगत भाजीपाला विक्रेते खराब भाजीपाला तसेच व्यावसायिकां कडून कचरा मैदानावर टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. पालिका प्रशासनाकडून कचरा उचलण्यासाठी दुर्लक्ष केले जात आहे. तालुका क्रीडा संकुल प्रशासनाकडून संबंधितांवर कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर रात्रीच्या वेळी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांचे प्रमाण वाढत चाललेले असून त्यांना कोणाचेही भय राहिलेले नाही. खेळाडूंसाठी क्रीडा संकुलांचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरी समस्येची दखल जिल्हा क्रीडा संकुल व पालिका प्रशासनाने घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी खेळाडू व स्थानिकांकडून करण्यात येत आहे.