ऑनलाईन लोकमतनंदुरबार : स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणा:या कोठली, ता.नंदुरबार येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचा राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्काराने शुक्रवारी दिल्लीत गौरव करण्यात आला. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शाळेला गौरविण्यात आले.मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने 2016-17 साठी देशभरातील सर्व शाळांना स्वच्छता विद्यालय पुरस्कार स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार देशभरातील दोन लाख 68 हजार शाळांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातील 16 शाळांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यात कोठली येथील शासकीय आश्रमशाळेचाही समावेश आहे. या आश्रमशाळेने गेल्याच वर्षी आयएसओ दर्जा मिळविलेला आहे.शुक्रवारी दिल्ल छावणी परिसरातील केंद्रीय विद्यालयाच्या डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन सभागृहात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, सचिव आनंद स्वरूप, अपर सचिव अनिता करवल यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक जगदीश पाटील, स्वच्छता समितीचे अध्यक्ष विलास वळवी, अरुण पाडवी यांनी हा पुरस्कार स्विकारला. प्रशस्तीपत्र, 50 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शाळेने मिळविलेल्या या सन्मानाबद्दल जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, प्रकल्प अधिकारी निमा आरोरा यांनी मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षकांचे अभिनंदन केले.
कोठली मुलींची आश्रमशाळा स्वच्छ विद्यालय पुरस्काराने सन्मानीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 11:51 AM