रस्त्यासह इतर विकासकामांना नागरिकांचा विरोध नाही.; परंतु विकास होत असताना नागरिकांचेही हित जोपासणे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. प्रकाशा-शहादा रस्त्याचे रुंदीकरणाचे काम झाले आहे. या रस्त्याच्या कामात मातीचा भराव करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने करजई गावालगत गावठाण जागेची निवड केली. त्या जागेवर जेसीबी व पोकलेन मशीनद्वारे मातीचा उपसा करण्यात आला. त्यामुळे सुमारे ७० ते ८० फूट खोल व १०० फूट लांब असा मोठा खड्डा झाला आहे. हा खड्डा म्हणजे तलावच तयार झाला आहे. येथून मातीचा उपसा करण्यासाठी ठेकेदाराने संबंधित विभागाची परवानगी घेतली होती का? असा सवाल परिसरातील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. जर परवानगी दिली घेतली असेल तर नियमाप्रमाणे खोदकाम झाले आहे का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ठेकेदाराने रस्त्यावर टाकण्यासाठी माती उपसल्यानंतर खड्ड्याभोवती संरक्षक कठडे केलेले नाहीत. नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्यामुळे १० ते १२ किलोमीटर अंतरातील कूपनलिकांना फायदा होणार आहे ही चांगली बाब असली तरी तेथे उपाययोजना करणे आवश्यक आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शेळ्या चारण्यासाठी गेलेला करजई येथील २१ वर्षीय तरुण भिकेसिंग सरदारसिंग गिरासे हा या खड्ड्यातील पाण्यात बुडून मरण पावला. घरातील कर्ता व एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या तलावासदृश खड्ड्याजवळून लोकांचे व गुरा-ढोरांचे नेहमी येणे-जाणे असते. मात्र, त्याठिकाणी सुरक्षेसाठी कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे भविष्यात हा तलाव लोकांसाठी व गुरा-ढोरांसाठी जीवघेणा ठरू शकतो, अशी भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन याठिकाणी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे, अन्यथा अनंत चतुर्दशीला घडलेल्या घटनेप्रमाणे घटना घडतच राहतील.
करजई गावाजवळील तलाव धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:34 AM