लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अखिल भारतीय लोणी मराठा युवा संघटनेचा युवा जागर मेळावा 11 मार्च रोजी बुरझड, ता.धुळे येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 10 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे. समाजाचे अध्यक्ष विनोद शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली होणा:या या मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा होणार आहे. पहिल्या सत्रात विविध क्षेत्रातील मान्यवर युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतरच्या सत्रात खुली चर्चा होणार आहे. समाजाची बदलाच्या दिशेने वाटचाल, समाज विकास, मुलींचे शिक्षण, युवकांसाठी स्वयंरोजगार यासह सामाजिक चालिरिती व रुढी-परंपरा या विषयांवर ही खुली चर्चा होणार आहे. सकाळी येणा:या प्रत्येक समाजबांधवाची नोंद केली जाणार आहे. दुपारच्या सत्रानंतर मेळाव्याचा समारोप करण्यात येणार आहे.मेळाव्यासंदर्भात जनजागृतीसाठी युवा संघटनेने गेल्या महिनाभरापासून राज्यभर समाजाच्या गावांमध्ये जावून युवकांना व समाजबांधवांना आवाहन केले आहे. ‘युवा जुळवा, समाज घडवा’ हे ब्रिद घेवून युवकांनी जनजागृती केली आहे. समाजाचा अशा प्रकारचा हा पहिलाच मेळावा असल्यामुळे त्याविषयी उत्सूकता निर्माण झाली आहे. मेळाव्याचे आयोजन बुरझड ग्रामस्थ व युवा संघटनेतर्फे करण्यात आले आहे.राष्ट्रीय स्तरावरच्या या पहिल्या मेळाव्यासाठी युवकांनी व समाज बांधवांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय लोणी मराठा समाज संचलित लोणी मराठा युवा संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
लोणी मराठा राष्ट्रीय युवा जागर मेळावा उद्या बुरझडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:31 PM