लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील २२ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत बुधवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचार फे-या रंगल्या होत्या. दिवसभरात निवडणूक लढवणा-या दोन्ही पॅनलच्या फे-या निघाल्याने गावोगावी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील एकूण २७ पैकी सहा ग्रामपंचायती ह्या बिनविरोध झाल्या होत्या. या सहा ग्रामपंचायतीतील २३ प्रभागांत बिनविरोध सदस्य निवडून आले आहेत. यामुळे शुक्रवारी २१ ग्रामपंचायतींच्या ६६ प्रभागांत निवडणूक कार्यक्रम होणार आहे. या ६६ प्रभागांमध्ये ४१ हजार ५७० मतदार मतदान करणार आहेत. या मतदारांकडून एकूण ४४९ उमेदवारांचा फैसला होणार आहे. दरम्यान बुधवारी निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने असलाेद, सारंगखेडा, मोहिदे तर्फे शहादा, कुकावल, तोरखेडा, बामखेडा, फेस या गावांमध्ये प्रचार फे-या काढण्यात आल्या होत्या. या फे-यांमध्ये महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला होता. घरोघरी पुढे उमेदवार व मागे कार्यकर्ते असा लवाजमा दिसून आला. यात काहींचे ग्रामस्थांकडून औक्षण करुन स्वागत करण्यात आल्याचेही चित्र यावेळी दिसून आले. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून गुरुवारी दुपारनंतर हे कर्मचारी २२ गावांकडे रवाना होणार आहेत. सोबत पोलीस कर्मचारीही रवाना होणार असून संवेदनशील मतदान केंद्रांसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
संक्रांतीचीही संधी दरम्यान मतदान शुक्रवारी होणार आहे. गुरुवारी संक्रांती साजरी होणार आहे. सण साजरा होत असताना तिळगूळ घ्या आणि मतदान करा असे साकडेच उमेदवार मतदारांना घालणार असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील काहींनी यासाठी विशेष लाडूही मागवून घेतल्याची माहिती आहे.