लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रोत्सवास रविवारपासून प्रारंभ होत आहे. यात्रोत्सवाची मंदिर ट्रस्ट व प्रशासनाकडून पूर्ण तयारी झाली आहे. यंदा चेतक फेस्टीवलमार्फत महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याने यात्रेकरुंना आगळी-वेगळी मेजवानी मिळणार आहे. दरम्यान, सायंकाळी उशिरा दत्ताची पालखी काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते.यंदा यात्रेकरू व पर्यटकांना सारंगखेडा यात्रा आगळी-वेगळी यात्रा म्हणून अनुभवास येणार आहे. चेतक फेस्टीवल समिती व शासनाच्या पर्यटन विभागातर्फे महिनाभर सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी विविध स्पर्धा, हॉर्स शो, फोटो प्रदर्शनी, घोडय़ांच्या शर्यती, शरीर सौष्ठव स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांची तयारी पूर्ण झाली असून देशी-विदेशी व्हीआयपी पर्यटकांसाठी पंचतारांकीत हॉटेलच्या धर्तीवर स्वतंत्र टेन्टसिटी उभारण्यात आली आहे. शेजारीच बॅरेजमध्ये बोटींेग, स्पीड बोट आदी सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती फेस्टीवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी दिली.ग्रामपंचायतीकडून स्वच्छतेसाठी 30 कर्मचारी नियुक्त नियुक्ती करण्यात आले असून सरपंच भारती कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी आर.आर. बोरसे हे यात्रेत वीज, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छता आदी बाबींवर लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर दिवसातून दोनवेळा घंटागाडीद्वारे यात्रेतील रसवंती, हॉटेल्स व इतर व्यावसायिकांचा निघणारा कचरा गोळा केला जाणार आहे.दत्त मंदिर ट्रस्टने मंदिरावर आकर्षक विद्युत रोशणाई, सीसीटीव्ही कॅमेरे, गाभा:यातील दर्शनासाठी स्क्रीन, नारळ फोडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, महिला-पुरुषांसाठी दर्शनाची स्वतंत्र सोय, भाविकांना दर्शन व्यवस्थित घेता यावे यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. मंदिरावर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला असून महिला पोलिसांची संख्या वाढवली आहे. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अजरुन सोमजी पाटील, उपाध्यक्ष रवींद्र कथ्थू पाटील, भिक्कन पाटील व पदाधिकारी त्यासाठी प्रयत्नशील आहेत.आरोग्य विभागाकडून वेगवेगळ्या पथकांद्वारे सेवा दिली जाणार आहे. यात्रेच्या पाश्र्वभूमीवर जादा औषधसाठा मागविण्यात आला असून काही पथके दिवसातून दोन-तीनवेळा हॉटेल्स, शीतपेय व खाद्य पदार्थाच्या दुकानात जाऊन पाणी शुद्धीकरणासाठी जागरुकता करतील. आरोग्य केंद्रात 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश पाटील यांनी दिली. घोडे बाजारात विक्रीसाठी आलेल्या घोडय़ांची काळजी घेण्यासाठी पुरेसा औषधसाठा व कर्मचारी नेमण्यात आल्याची माहिती डॉ.अभिषेक पेंढारकर यांनी दिली.यात्रेत वीजपुरवठा सुरळीत रहावा यासाठी अतिरिक्त दोन ट्रान्सफार्मर बसविण्यात आले असून ट्रान्सफार्मरजवळ 24 तास पथक तैनात राहील. त्याचबरोबर यात्रा परिसरातील जीर्ण वीज तारा बदलण्यात आल्या असून सुरळीत वीजपुरवठय़ासाठी उपअभियंता टी.एन. मन्सुरी, अधिकारी व कर्मचारी प्रय} करीत आहेत. यात्रा काळात 90 जादा बसेस सोडण्यात आल्याची माहिती शहादा आगाराकडून देण्यात आली. या बसेस शिरपूर, शहादा, दोंडाईचा, धुळे व इतरत्र सोडण्यात येतील.कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी सारंगखेडा यात्रेसाठी एक पोलीस उपअधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक असे 10 अधिकारी, 100 पोलीस कर्मचारी, 27 महिला पोलीस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सारंगखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांनी दिली. यात्रेत शहादा, तळोदा, नंदुरबार व दोंडाईचा पालिकेचे अगAीशमन बंब आळीपाळीने राहणार आहेत.यात्रेकरूंच्या मनोरंजनासाठी झुले, मौत का कुआ, तमाशा आदी साधने दाखल झाली आहेत. ही यात्रा शेतक:यांची यात्रा म्हणूनदेखील प्रसिद्ध असल्याने शेती साहित्य व पारंपरिक विविध औजारांसोबत आधुनिक पद्धतीचे यंत्र व औजारांचे यंदा चेतक फेस्टीवलमध्ये स्टॉल उभारण्यात आले आहेत.
पालखी सोहळ्याने सारंगखेडा यात्रेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 1:11 PM