मासळी ही नाशवंत असून, त्याची वेळीच प्रक्रिया केली तर मासळी ताजी राहून खराब होत नाही. ज्यावेळी मासळी मोठ्या प्रमाणात प्राप्त होतात. त्यावेळीच त्याची कमी दरात विक्री होते. त्यावेळी मासळीला मूल्यवर्धीत करून विविध पदार्थ बनविले तर या पदार्थाला उच्चतर दर प्राप्त होतो. त्यासाठी आय.सी.ए.आर.चे केंद्रीय मत्स्य व्यवसाय शिक्षण संस्था वर्मोवा, मुंबई यांनी नंदुरबार जिल्ह्यातील खैरवे, ता.नवापूर या मच्छीमार संस्थेच्या सभासदांना विविध पदार्थ तयार करण्यासाठी साहित्य पुरवठा केला आहे. त्यात फ्रिज, डिपफ्रिज, स्टील टेबल, मासळी विक्रीसाठी सोलर फ्रिजसह फिरती लोटगाडी, शेगडी आदी साहित्याचा समावेश आहे. या प्रकल्पाची वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.
आमदार डॉ.विजयकुमार गावित यांनी जिल्ह्यातील मत्स्योत्पादन वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी गोड्या पाण्यातील मत्स्य संस्कृती प्रणालीमध्ये मासे आरोग्य व्यवस्थापन कौशल्य आणि ज्ञान विकास कार्यक्रमाचेही उद्घाटन झाले. पुढील तीन वर्षात जिल्ह्यातील तळीधारक शेतकऱ्यांना मासळीचे आरोग्यविषयक प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. कार्यक्रमास आय.सी.ए.आर. केंद्रीय मत्स्य व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक व उपकुलसचिव डॉ.गोपाल कृष्णा, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय नंदुरबार किरण पाडवी, प्रधान शास्त्रज्ञ डॉ.बी.बी. नायक, प्रधान शास्त्रज्ञ डॉ.ए.के. बालंगे, डॉ.गायत्री त्रिपाठी, डॉ.मनीष जैन, डॉ.किरण रसाळ, डॉ.विद्याश्री भारती, अविनाश साळवे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सैयद हमजा, कनिष्क आचार्य, खैरवे येथील नवजीवन मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन दिनेश वसावे उपस्थित होते. नवजीवन मच्छीमार सहकारी संस्थेच्या २१४ सदस्यांसह उन्नती महिला बचट गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.