लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. यातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. प्राथमिक व माध्यामिक वर्गात जाणा-या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवण्याची भिती असल्याने याठिकाणी आता गावो गावचे शिक्षित विद्यार्थी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातून सोन बुद्रुक ता. धडगाव येथे ग्रामज्ञान केंद्र सुरु करण्यात आले आहे. सोन बुद्रूक या गावात सुशिक्षित युवकांनी एकत्र येऊन विद्यार्थांसाठी वर्ग चालू करण्याचे ठरवले आणि हे प्रत्यक्षात देखील उतरवलं. त्यास ग्रामज्ञान केंद्र असे नांव दिलं आणि पहिली ते पदवीपर्यंतचे वर्ग सुरू केले. गेल्या १ जूलैपासून ते अद्यापपर्यंत या ग्रामज्ञान केंद्रांत गावातील पहिली ते पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे. गावातील तरुणाईने एकत्र येत हा उपक्रम सुरु केला आहे. आपल्या भाऊ-बहिणीचे कोरोनामुळे बंद असलेल्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांवर त्याचा विपरित परिणाम होऊ नये तसेच सुरू असलेल्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी गावातील ग्रामज्ञान केंद्राने खूप प्रयत्न केल्याचे येथील युवकांकडून सांगण्यात आले. त्यांच्या या प्रयत्नाला चांगले यश ही मिळाले. त्यास केंद्रातून गावातील ९० विध्यार्थी वेगवेगळ्या वर्गातून शिक्षण घेत असल्याचे चित्र सध्या याठिकाणी दिसून येत आहे. शाळेतील होणाऱ्या विविध स्पर्धांचा कमीपणा मुलांना वाटू नये म्हणूनच या तरुणाईने विविध महापुरुषाची जयंती, पुण्यतिथीसह सामाजिक कार्य या सर्व बाबींवर उत्साहात कार्यक्रम पार पाडले. हे सर्व यशस्वी करण्यासाठी या तरुणाईला गावातील नोकरवर्ग सर्व गावकरी, पालकवर्ग, युवक, पोलीस पाटील, तसेच ग्रामपंचायत प्रशासन सहाकार्य करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ग्रामज्ञान केंद्र सोन बुद्रूकचे कार्य बघून शहादा येथील सामाजिक संस्था विचारधारा फाउंडेशनचे अध्यक्ष तात्या पवार यांनीही याठिकाणी भेट देत मदत करण्याची हमी दिली आहे. यावेळी त्यांच्याहस्ते केंद्रात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण साहित्यांचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील सामाजिक संघटना आदिवासी टायगर सेना धडगाव यांनी देखील मुलांना शैक्षणिक साहित्य या सर्व ९० विद्यार्थिनींना वाटप केली.ग्रामज्ञान केंद्रांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून या तरुणाईने कोणत्याही प्रकारची शिकवणी फी आकारली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. गावातील शिक्षित युवकांनी केवळ सामाजिक जाणीव ठेवत हे केंद्र सुरु केल्याची माहिती युवकांकडून देण्यात आली. विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन व तासिका देत त्यानुसार येथे कामकाज सुरु आहे. एक युवक एक विषयावर अभ्यास घेत विद्यार्थ्यांकडून अभ्यास करवून घेत असल्याची माहिती देण्यात आले आहे. गावातील युवकांनी केलेल्या उपक्रमाचे काैतूक होत असून दुर्गम भागातील इतर शिक्षित युवक या प्रकारचे उपक्रम गावोगावी सुरु करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
३० विद्यार्थ्यांचा एक गट तयारया विद्यार्थ्याना शिकविण्यासाठी गावातील सुशिक्षित १२ जणांचा ग्रुपदेखील आहे. या ग्रुपमधील तरुण वर्ग कोरोना महामारीच्या कठिण काळात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अहोरात्र मेहनत करून प्रत्येक वर्गाचा अभ्यास क्रमानुसार वेळापत्रक तयार करून ३० विद्यार्थ्याचा गट तयार करून तीन शिप्ट मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत. ग्रामज्ञान केंद्रामध्ये शालेय शिक्षणासोबतच आदिवासी संस्कृतीचे धडेदेखील दिले जात होते. जेणेकरून येणाऱ्या पिढीने आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करावे हा उद्देश होता.