n लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग व जिल्हा महिला समुपदेशन केंद्रातर्फे महिलांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. शहरातील अटलबिहारी वाजपेयी सभागृहात ही कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव सतीश मलिये, महिला आर्थिक विकास महामंडळाचे तुषार पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सतीश मलिये यांनी सांगितले की, महिलांना कायद्याचे ज्ञान देणे आवश्यक आहे. आपल्या हक्कासाठी लढत असताना कुटुंबांची जबाबदारी, समाजात प्रतिष्ठेची वागणूक आणि अत्याचाराच्या विरोधात लढा देण्यासाठी महिला समुपदेशन केंद्र कार्यरत आहे. तेथून कायद्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी महिलांनी स्वबळावर प्रगती करावी, प्रत्येक महिलेला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ते मिळवण्यासाठी समुपदेशन केंद्राचा लाभ घ्यावा, असे सांगितले. यशस्वीतेसाठी केंद्राच्या जिल्हा विधितज्ज्ञ ॲड. मंगला वसावे, जिल्हा समुपदेश ॲड. पूर्वीशा बागुल, सुमित्रा वसावे, ॲड. निशा पाडवी यांनी परिश्रम घेतले.
महिलांसाठी कायदेविषयक कार्यशाळा नंदुरबारात उपक्रम ; महिला समुपदेशन केंद्रातर्फे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 12:39 PM