लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धुळे व नंदुरबार जिल्हा सीमेवार साक्री वनक्षेत्राच्या हद्दीत बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची घटना सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या बिबट्यावर साक्री वनक्षेत्र हद्दीत अंत्य संस्कार करण्यात आले. नंदुरबार वन परिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी यांना सोमवारी सकाळी सिंदबन परिसरात बिबट्या मयतावस्थेत आढळून आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकासह भेट दिली असता, इसर्डे ता. साक्री शिवारात संजय हिराकरे यांच्या शेतात बिबट्या मयतावस्थेत आढळून आला. हा भाग साक्री तालुक्यातील असल्याने रघुवंशी यांनी साक्री तालुका वन परीक्षेत्र अधिकारी कैलास सोनवणे यांना माहिती दिली होती. सोनवणे यांनी घटनास्थळी दाखल होत बिबट्याची पाहणी करत पचंनामा केला. साक्री तालुक्याकडून नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा वनक्षेत्रात येताना पाणी न मिळाल्याने सहा वर्षीय वृद्ध बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान साक्री येथील पशुवैद्यकीय अधिकारी एस.आर.कोळेकर यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन करत बिबट्याच्या शरीरातील विविध अवयवांचा व्हिसेरा काढून घेत नाशिक येथे तपासणीसाठी पाठवला आहे. ही कारवाई सहायक वनसरंक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात वनक्षेत्रपाल कैलास सोनवणे, वनरक्षक शितल तोरवणे, संजय पाटील, आबा बागुल, दाैलत खैरनार, नंदुरबारचे वन परिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी, वनपाल युवराज भाबड यांनी केली. दरम्यान येत्या काही दिवसात व्हिसेरा रिपोर्ट येणार असून त्याच्या अहवालानंतर बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा हे समजणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल कैलास सोनवणे यांनी दिली आहे. दरम्यान ठाणेपाडा शिवारात सध्या बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले सुरू असल्याने या घटनेची चर्चा सुरू होती. परंतू मयत बिबट्या साक्री तालुक्यातून नंदुरबारकडे येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
धुळे-नंदुरबार जिल्हा सीमेवर बिबट्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 12:15 PM